संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- वृंदावन कृषी महाविद्यालयात सन 2024 -25 या शैक्षणिक वर्षातील आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चंदनापुरी घाटातील संस्था परिसरात दि. १०ते११ रोजी ही स्पर्धा होणार असल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. रोहित उंबरकर यांनी दिली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि डॉक्टर आर एस गुंजाळ वेलफेअर फाउंडेशन संचलित वृंदावन कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा 2024 -25 चे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन संगमनेर विभागाचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांच्या हस्ते होणार आहे अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राधेश्याम गुंजाळ हे असणार आहेत. यावेळी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीर चव्हाण, संस्थेचे सचिव राहुल गुंजाळ, विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वृंदावन कृषी महाविद्यालयामध्ये संपन्न होणाऱ्या या स्पर्धांमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या दहा जिल्ह्यातील सर्व कृषी महाविद्यालयातील स्पर्धक सहभागी होणार आहेत अशी माहिती स्पर्धा समन्वयक प्रा. दादासाहेब गोलांडे यांनी दिली.