आश्वी( जनता आवाज वृत्तसेवा):-राज्यातील दूध उत्पादकांना प्रतीलिटर ३० रुपये दर आणि ५ रुपयांचे अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतल्याबद्दल रहिमपूर ग्रामपंचायतीने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव समंत केला आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून दूध उत्पादक शेतक-यांचे आंदोलन सुरु आहेत. दूधाला दरवाढ मिळावी ही प्रमुख मागणी शेतक-यांची आहे. यासर्व पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकरी, दूध संघ चालक यांच्या बैठका घेवून यामध्ये मार्ग काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
सध्या सुरु असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी आधिवेशनाच्या दरम्यानही मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन, दूधाला प्रतीलिटर तीस रुपये भाव आणि ५ रुपये अनुदान देण्याबाबतचा आग्रह धरला. याप्रस्तावाला मंत्रीमंडळानेही मंजुरी दिली. याबाबतचे निवेदन मंत्री विखे पाटील यांनी विधीमंडळात केल्यानंतर राज्यातील दूध उत्पादक शेतक-यांना मोठा आधार मिळाला आहे.
महायुती सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, मंत्री विखे पाटील आणि महायुती सरकारचे अभिनंदनही करण्यात येत आहे. रहिमपूर ग्रामपंचायतीमध्ये याबाबतचा ठराव श्री.सचिन शिंदे यांनी मांडला त्यास श्री.रविंद्र गाढे यांच्यासह दूध उत्पादक शेतक-यांनी अनुमोदन दिले. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच आणि सदस्य उपस्थित होते.