श्रीरामपूर (प्रतिनिधी ):- श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडीच्या पहिल्याच बैठकीत सभापती पदासाठी निवडणूक होऊन त्यात विखे ससाणे गटाच्या उमेदवारांना समसमान मत पडल्याने चिठ्ठी काढून ससाणे गटाची सुधीर नवले यांची सभापती निवड झाली आहे. तर उपसभापती म्हणून विखे गटाचे अभिषेक खंडागळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या वर्षी नवले व खंडागळे हे दोन्हीही बेलापूर येथील रहिवासी असून यंदा बेलापूरवासियांना सभापती व उपसभापती दोन्ही पदे बेलापूर या गावात मिळण्याची पहिलीच वेळ असून त्यामुळे बेलापूर गावामध्ये आनंदाचे वातावरण होते. सभापती उपसभापती निवड नंतर श्रीरामपूर व इतर ठिकाणी कार्यकर्त्यांनी पेढे वाटून व गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला आहे.
निवड प्रक्रियेत मुरकुटे गटाने सभात्याग करत तटस्थ भूमिका घेतली. सभागृहात उपस्थित संचालकांचे मतदान घेण्यात आले. ससाने गटाकडून सुधीर नवले तर विखे गटाकडून गिरीधर आसने सभापती पदासाठी उमेदवार होते. दोघांनाही समसमान मते मिळाल्याने चिठ्ठी काढण्यात आली. त्यात सुधीर नवले यांना ईश्वरी कौल मिळाल्याने सभापतीपदी त्यांची निवड झाली.
सभापती निवडीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाला अपयश आले. विजयाचे पक्के गणित बांधले असताना एक संचालक कोण फुटला? यावर निवडीनंतर खल सुरू झाला.




Total Users : 629122