श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा) : – श्रीरामपूर-गणेशनगर रस्त्यालगत असलेल्या वाकडी शिवारात द्राक्षाच्या बागेत खुरपणी करत असलेल्या ३५ वर्ष वयाच्या तरुण महिलेला भरदुपारी १२ च्या सुमारास ऊसाचे शेतात ओढत नेवून तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असल्याचे निदर्शनास येत आहे.
या घटनेतील पीडीत महिलेने श्रीरामपूर तालुका पोलीसात फिर्याद दिल्यावरून आरोपी किशोर कारभारी येणगे (रा .वाकडी शिवार) याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर तालुका पोलीसांनी आरोपी किशोर येणगे याला अटक केली आहे.
तर राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे दोन तरुण पाठलाग करून नेहमी क्लासला जाणाऱ्या विद्यार्थिनीला छेडछाड काढायचे. बळजबरीने बोलायचे या त्रासाला कंटाळून एका तरुणीने रेल्वे खाली उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविली. या धक्कादायक घटनेप्रकरणी मुलीच्या आईने राहुरी पोलीसात फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीवरून देवळाली प्रवरा येथील आरोपी संसारे व कसबे यांच्याविरोधात कलम ३०६ ,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस करत आहे.
दिवसेंदिवस अहमदनगर जिल्ह्यामध्ये महिलांवरील अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. त्यातच मुलींवर होणारे अत्याचार व छेडछाडीमुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



