कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- कोल्हार येथील भगवतीपूर देवालय ट्रस्टला नवी दिल्ली येथील हाईव्ह माईंड सर्टिफिकेशन संस्थेमार्फत गुणवत्तापूर्ण, उच्चतम आणि दर्जेदार व्यवस्थापन पद्धतीसाठी नुकतेच आय.एस.ओ. मानांकन नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
श्री भगवती देवी मंदिर मंदिरातील देवालय ट्रस्ट कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी रघुनाथ खर्डे, खजिनदार डॉ. भास्करराव खर्डे व कोल्हार बुद्रुक चे माजी सरपंच अॅड. सुरेंद्र खर्डे पाटील यांनी या मानांकनाबाबत माहिती दिली.
कोल्हार भगवतीपुर देवालय ट्रस्टने आपल्या उद्देश पूर्तीसाठी धार्मिक स्थानाचे महात्म्य टिकवतानाच सामाजिक, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक क्षेत्रासाठी महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे.
देवालय ट्रस्ट अंतर्गत ग्रामदैवत श्री भगवती देवी मंदिर तसेच गावातील श्री कोल्हाळेश्वर महादेव मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर,हनुमान मंदिर, शनैश्वर मंदिर, श्री. महालक्ष्मी मंदिर आदि मंदिरांचे व्यवस्थापन तसेच यात्रा, सण उत्सव – महोत्सवांचे उत्कृष्ठ नियोजन त्याबरोबरच रक्तदान शिबिर, साक्षरता कार्यक्रम, योगासन वर्ग, संगीत प्रशिक्षण आदिंचे यशस्वीपणे आयोजन केलेले आहे.
कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्ट मार्फत परिसरातील शाळेतील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच शालेय गणवेश, शालेय साहित्य, शाळेसाठी ध्वनिक्षेपकयंत्रणा आदिंचे वाटप केलेले आहे. देवालय ट्रस्टने अशा विविध क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य,दिलेले मौलिक योगदान आणि त्यासाठीच्या गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन पद्धतीसाठी सदर मानांकन नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
दरम्यान याप्रसंगी देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष साहेबराव दळे, सरचिटणीस संपतराव कापसे तसेच विश्वस्त सौ. शितल सुरेंद्र खर्डे, चंद्रभान आप्पासाहेब खर्डे, संभाजी देवकर, नानासाहेब कडसकर लक्ष्मण बाळासाहेब खर्डे, सर्जेराव सोन्याबापु खर्डे, विजय माधवराव निबे, जनार्दन सर्जेराव खर्डे, वसंत नानासाहेब खर्डे, अजित रमेश मोरे, सुजित लक्ष्मण राऊत उपस्थित होते.