श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा) :- तू मला आवडते म्हणत विवाहीतेचा पाठलाग करत तिला बळजबरीने काळ्या-पिवळ्या गाडीत बसवून गाडीतच तिच्यावर बलात्कार करण्याचा खळबळजनक प्रकार श्रीरामपूर शहरात घडला आहे.
विशेष म्हणजे या महिलेला ‘तू खालच्या जातीची आहे, मी मुसलमान आहे, आता मी तुला शुद्ध केले तू माझ्याशी लग्न कर’, असे म्हणत, तिला धमकावण्याचाही प्रकार घडला असून याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी इजाज बागवान (पुर्ण नाव माहित नाही, रा.वार्ड नं. २) याच्यावर अॅट्रॉसिटीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सदर ३५ वर्षीय महिला ही श्रीरामपूर शहरात राहते. साधारण २० दिवसांपूर्वी ही महिला कामावर जात असताना एक इसम तिचा पाठलाग करत होता. त्यामुळे तिने थांबून तू माझा पाठलाग का करतो? तू कोण आहे? असे विचारले. तेव्हा त्याने माझे नाव इजाज बागवान आहे, तुमच्याशी बोलायचे आहे, असे म्हणाला.
तेव्हा सदर महिलेने मला बोलायचे नाही, असे म्हणून निघून गेली. संध्याकाळी सहाला कामावरून घरी परतताना इजाज याने पुन्हा या महिलेचा तिच्या घरापर्यंत पाठलाग केला आणि ही महिला घरात घुसताच तोही तिच्या घरात घुसला व तू माझ्याशी का बोलली नाही? असे म्हणत तू मला आवडली आहे, असे म्हणाला. तेव्हा माझे लग्न झाले आहे, मला दोन मुले आहे असे या महिलेने त्याला सांगितले.
तेव्हा इजाज म्हणाला की, तुला नवरा सोडून गेला आहे, जास्त नाटक करू नको. तेव्हा या महिलेचे मुलं रडायला लागले तेव्हा इजाज हा घरातून निघून गेला. १९ जुलैला सकाळी ही महिला खबडी परिसराजवळून कामावर जात असताना इजाज बागवान हा एक काळी-पिवळी जिप घेवून तिच्या मागे आला व तिच्याजवळ गाडी थांबवून तो उतरला व तिचा हाथ धरून त्याने बळजबरीने या महिलेला गाडीत बसवले व तोंडात मारून तू शांत पड नाहीतर येथे तुला मारून टाकले तरी कोणी तुला बघायला येणार नाही.
सदर महिलेवर गाडीच्या सिटवरच या नराधमाने बलात्कार केला. त्यानंतर सदर महिला रडू लागली असता इजाज तिला म्हणाला ‘तू का रडते? तू खालच्या जातीची आहे, मी मुसलमान आहे, आता मी तुला शुद्ध केले तू माझ्याशी लग्न कर’, असे म्हणत त्याने या महिलेला दमदाटी, शिवीगाळ केली.
कोणाला काही सांगितले तर तुझे दोन्ही पोरं मारून टाकील, तुला श्रीरामपुरात राहू देणार नाही, तुला माझ्यासोबतच रहावे लागेल, असे म्हणत धमकी दिल्याने सदर महिला घरी येवून लपून बसली होती. त्यानंतर इजाज हा तिच्या घराजवळ चकरा मारत असल्याने या महिलेने पोलीस स्टेशन गाठून त्याच्याविरूद्ध फिर्याद दिली.
याप्रकरणी सदर महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी इजाज बागवान याच्याविरूद्ध अट्रॉसिटी, बलात्कारासह इतर कलमान्वये गुरनं. ७१२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पुढील तपास डिवायएसपी डॉ. बसवराज शिवपुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर पोलीस करीत आहेत.
नराधमांवर कायदेशीर कारवाई करा
श्रीरामपूर शहरात भरदिवसा अशा प्रकारचा खळबळजनक प्रकार घडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे श्रीरामपुर शहरातील महिला भयभीत झाल्या असून अशा नराधमांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.