शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा ) :- मागील आठवड्यात चेन्नई विमानतळावरून शिर्डीला येणारे विमान सलग दोन दिवस रद्द झाले. त्यामुळे साई दर्शनासाठी मलेशियातून आलेल्या ४४ भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मात्र येथील एका हॉटेलचे कार्यकारी संचालक दीपक निकम यांनी या भाविकांनी आरक्षित केलेल्या खोल्यांचे भाडे माफ करून चमूला सुखद धक्का दिला.
निकम म्हणाले, योग प्रशिक्षक व त्यांचे सहकारी मिळून ४४ भाविकांसाठी आमच्या गोरडीया हॉटेलचे रूम व सूट आरक्षित करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी सलग दोन दिवस विमान रद्द झाल्याने त्यांना नाइलाजाने तेथे मुक्काम करावा लागला. तिसऱ्या दिवशी पुणे व मुंबई विमानतळावर उतरून त्यांना वाहनभाड्याचा अतिरिक्त खर्च करून शिडॉत यावे लागले.
दुप्पट तिप्पट खर्च आणि मुक्कामही वाढला. शिर्डीत साईदर्शन झाल्यावर या भाविकांनी आरक्षित काळातील खोल्यांचे भाडे अदा करण्याची तयारी दर्शवली. मात्र त्यांना झालेला मनस्ताप आणि वाढलेला खर्च लक्षात घेऊन निकम यांनी या आरक्षित काळातल्या भाड्याची आगाऊ भरलेली मोठी रक्कम त्यांना परत केली. त्यांच्या या कृतीमुळे या चमूला सुखद धक्का बसला.
येथून रवाना होण्यापूर्वी चमूतील प्रत्येकाचा सत्कार करण्यात आला. साई दर्शनासाठी भारतात आल्यानंतर झालेला मनस्ताप दूर व्हायला निकम यांच्या कृतीने मदत झाली.