नगर (जनता आवाज वृत्तसेवा ):-नगरच्या उड्डाणपुलावरील वळणावरून आज पुन्हा एकदा अपघात झाला. एक ट्रक चक्क उड्डाणपुलावरील संरक्षण कठड्यावरील जाळी तोडून थेट ट्रक उड्डाणपुलाखाली पडला. यात दोन जण गंभीर जखमी झाल्याचे समजते.
छत्रपती संभाजीनगरकडून पुण्याच्या दिशेने निघालेला एक ट्रक (एमएच २० जीसी ६४५०) आज दुपारी चार वाजताच्या सुमारास नगरच्या उड्डाणपुलावरून जात होता. उड्डाणपुलावरील वळणावर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट उड्डाणपुलावरील संरक्षण कठडे तोडत खाली रस्त्यावर पडला. या ट्रकमध्ये पीव्हीसी पाईप व त्याचे साहित्य होते. यात दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.