नगर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- राज्यातील तलाठी भरती प्रक्रियेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांना खुले आव्हान देत तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शकपणे झाली आहे. त्यांचे आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारणातून बाहेर पडेल. अन्यथा त्यांनी राजकारणातून बाहेर पडावे, असे खुले आव्हान विखे यांनी थोरात यांना दिले आहे.
नगरमधील एका शासकीय कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे विधान केले. मंत्री विखे पाटील म्हणाले की, माझ्यावर जे भ्रष्टाचार आरोप केले आहेत त्यावर माजी महसूलमंत्र्यांना आव्हान आहे. तुम्ही एकदा साईबाबांच्या मंदिरात या. मी पण तिथे थांबतो.
साईबाबांच्या समाधीवर हात ठेवून सांगा की, यात भ्रष्टाचार झाला आहे. त्यांचे आरोप खरे निघाले तर मी राजकारण सोडून देईल आणि आरोप सिद्ध झाले नाही तर त्यांनी राजकारण सोडून द्यावे, असे आव्हान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिले आहे.




