श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ):- तपासणीसाठी रुग्णालयात आलेल्या विद्यार्थीनीवर डॉक्टरने अत्याचार केल्याची घटना श्रीरामपुर शहरात घडली आहे. त्यानुसार पीडितीने दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टरवर श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रासह नागरीकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पीडित विद्यार्थिनीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 4 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास ती आणि सोबत असलेल्या महिला कुटे हॉस्पिटल (शिरसगाव ता. श्रीरामपुर) येथे उपचारासाठी गेले होते. तेथील महिला कर्मचारी यांनी फिर्यादीला डॉक्टरांच्या ओपीडीमध्ये नेले व त्यांनतर तेथे डॉ. रविंद्र कुटे हे आले. त्यांनी विद्यार्थिनीची सर्व विचारपुस केली व तिला बेडवर झोपण्यास सांगितले.
त्यानंतर डॉक्टरने तपासण्यास सुरुवात केली. डॉक्टर विद्यार्थिनीला तपासत असताना त्यांनी विचित्र पध्दतीने छातीला, पोटाला, पाठीसह अन्य ठिकाणी महिलेला लज्जा उत्पन्न हाईल, असे कृत्य केले.
यावेळी विद्यार्थिनीने सोबत आलेल्या महिलांना आवाज देऊन आतमध्ये बोलावले असता विद्यार्थिनीसह सर्वांना डॉक्टरने शिवीगाळ करुन झाडु फेकुन मारला व जबर मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी राहाता तालुक्यातील पीडीत विद्यार्थीनिने श्रीरामपूर शहर पोलीसांत दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी डॉ. रविंद्र कुटे व रुग्णालयातील एक महिला कर्मचारी यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४, ७४, ११५ (२), ३५ २, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई मगरे हे करत आहे.