नगर (जनता आवाज वृत्तसेवा):-अल्पवयीन शाळकरी अल्पवयीन मुलीचे हातपाय बांधून तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी इथं घडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपहरणाच्या या प्रकारामुळं पिंपळगाव उज्जैनी व परिसरात खळबळ उडाली आहे.
नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी इथं एका विद्यालयीतील १३ वर्षीय मुलीचं अपहरण करण्याचा प्रकार घडला. ती शिकत असलेल्या शाळेतूनच ती शाळेच्या गणवेशात असताना अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या मुलीचे हातपाय बांधून तिला शाळेच्या छतावर नेण्याचा प्रयत्न आरोपींनी केला.
दरम्यान, शहर आणि परिसरात अल्पवयीन मुलींची छेडछाड तसंच अपहरणाचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळं पालक आणि मुलींमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. मुलींना त्रास देणाऱ्या टवाळखोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
मुली पळविणाऱ्या टोळीनं हा प्रकार केला असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक माणिक चौधरी घटनास्थळी दाखल झाले. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला तिथली पाहाणी त्यांनी केली. दरम्यान, या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी माणिक चौधरी यांनी दिली.




