श्रीरामपुर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- श्रीरामपूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी १७८.६० कोटी रूपये मंजूर झाले असून या कामाचा भूमीपूजन समारंभ तसेच ७.११ कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचा भूमीपूजन समारंभ उद्या, गुरूवार दि. ८ ऑगस्ट रोजी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होत आहे.
गुरुवारी सकाळी ११ वाजता शहरातील वॉर्ड नं.७ मध्ये असणाऱ्या थत्ते मैदान येथे हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी श्रीरामपूर नगरपरिषद अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत २.० अभियानांतर्गत श्रीरामपूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजना (अंदाजपत्रकीय रक्कम १७८.६० कोटी) तसेच जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर २.०५ कोटी), नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना-१.३१ कोटी, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊसाठी नागरी वस्ती सुधार योजना रक्कम रू.३.७५ कोटी अशा एकूण ७.११ कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आज होणार आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते होणाऱ्या या कार्यक्रमास खा. भाऊसाहेब वाकचौरे, आ. किशोर दराडे, आ. राम शिंदे, आ. सत्यजित तांबे, आ. लहू कानडे, माजी खा. सदाशिव लोखंडे, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
उद्या होणाऱ्या या कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीरामपूर नगरपालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील तसेच मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी केले आहे.