नगर (जनता आवाज वृत्तसेवा ):-बांग्लादेशातील हिंदू आणि मंदिरे यांवर होणाऱ्या अत्याचाराचा तीव्र निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने अहमदनगर जिल्हा बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदला सकल हिंदू समाजांसह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून बांगला बांग्लादेशात अस्थिरतेचे वातावरण बनले आहे. आरक्षणाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाने प्रचंड हिसक वळण घेतल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी बांग्लादेशातून पळ काढल्यानंतर संपूर्ण बांग्लादेशी नागरिकांनी रस्त्यावर उतरून हिंसाचार सुरु केला आहे. याचा मोठा फटका बांग्लादेशात वास्तव्यास असणाऱ्या हिंदू कुटुंबियांना बसला आहे.
बांग्लादेशातून आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. या हिसाचाराचे रुपांतर आता अराजकतेमध्ये झाले आहे. सरकार विरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले आहे.
बांग्लादेशात २७ ठिकाणी हिंदूंना लक्ष करण्यात आले असून, जाणीव पूर्वक हिंदूंना लक्ष करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे, हिंदुंच्या घरांवर आक्रमण करणे, हिंदूंची दुकाने लुटणे, हिदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे, हिंदू महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहे.
एवढेच नव्हे तर, हिंदू नगरसेवकांची, हिंदू पत्रकाराची हत्या झाली. या गोष्टीमुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात बांग्लादेशी सैन्यदलाने जरी हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असेल, तरी भारत सरकारने त्यावर विसंबून न राहता हिंदू समाजाच्या आणि मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत.
याकडे केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अहमदनगरसह नाशिक, जळगाव यांसह आदी जिल्ह्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवार, दि. १६ ऑगस्ट २०२४ रोजी अहमदनगर, नाशिक व जळगाव बंदची घोषणा करण्यात आली आहे.
यासाठी आपण आपले पद, पक्ष विसरून फक्त एक हिंदू म्हणून या आवाहनात सहभागी होवून पाठींबा द्यावा, असे आवाहन सकल हिदू समाज, अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.
या बंदला सकल हिंदू समाजांसह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.