4.6 C
New York
Thursday, December 5, 2024

Buy now

spot_img
spot_img

अज्ञात तरुणाची शाळेत येऊन विद्यार्थिनीला मारहाण तिसगावमधील प्रकार

करंजी( जनता आवाज वृत्तसेवा): – बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना ताजी असतांनाच परवा  अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात तिसगाव येथील विद्यालयामध्ये शाळेत येऊन बाहेरच्या एका अज्ञात तरुणाने अकरावीत शिकणाऱ्या मुलीला मारहाण केल्याची घटना घडली असून विद्यालयाची बदनामी होऊ नये म्हणून पोलिसासमक्ष संबंधित तरुणाचा माफीनामा लिहून घेत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न शाळा व्यवस्थापनाकडून झाला आहे.

बदलापूर येथील घडलेल्या घृणास्पद प्रकारानंतर संपूर्ण राज्यातून संतापाची लाट उसळली असून शिक्षण मंत्र्यांसह संस्था चालक देखील अलर्ट झाले आहेत.शाळा विद्यालय परिसरात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक  नियमावली आखली जात आहे.परंतु तिसगाव या ठिकाणी बाहेरचा विद्यार्थी विद्यालयात येऊन विद्यार्थिनीला मारहाण करून निघून जातो मग शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी खरंच शाळेत तरी सुरक्षित आहेत का ? असा देखील प्रश्न या प्रकारावरून निर्माण होऊ लागला आहे.

तिसगाव येथे परिसरातील पंधरा-वीस गावचे मुलेमुली शिक्षण घेण्यासाठी येतात.परंतु नेहमीच या ठिकाणी तिसगावचे असो अथवा आजूबाजूच्या गावचे तरुण असो नेहमीच विद्यालय परिसरामध्ये घुटमळताना दिसतात.या तरुणांकडून अनेक वेळा शालेय मुलींची छेड काढण्याचा प्रकार झाल्याच्या घटना अनेक वेळा घडलेल्या आहेत.तरुण गावातीलच असल्यामुळे त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न स्थानिक नेते मंडळी करत नाही त्याचबरोबर बाहेरगावचे तरुण असले तर नेमकी वस्तूस्थिती माहीत नसल्यामुळे बाहेरगावचे नेते मंडळी देखील मिटवामिटवी करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतात.

तर शाळेची बदनामी होऊ नये म्हणून शाळा व्यवस्थापन देखील नेहमीप्रमाणे माफीनामे लिहून घेत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतात.तिसगाव येथे मुलींची छेड काढण्याचे प्रकार नेहमीच घडत असल्यामुळे अनेक मुलींनी इतर सुरक्षित ठिकाणी शिक्षण घेण्याचा मार्ग स्वीकारला आहे तर काही पालकांनी आपल्या मुलींची शाळाच बंद केल्याची चर्चा आहे.शाळेत येऊन विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकार यापूर्वी देखील घडलेले आहेत आणखी अशा पद्धतीच्या किती घटना घडल्यानंतर शाळा व्यवस्थापनाला जाग येणार आहे आणि अशा प्रकरणाबाबत ठोसपणे कारवाई करण्याची भूमिका घेणार अशी देखील चर्चा आता पालकांमधून सुरू झाली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!