राहाता (जनता आवाज वृत्तसेवा):- सुमारे १४ कोटी रुपयांच्या निधीतून विकसीत करण्यात आलेल्या राहाता पंचायत समितीच्या नुतन कार्यालयाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन आणि माजी मंत्री आ.पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात आ.पंकजा मुंडे यांचा नागरी सत्कारही संपन्न होणार आहे.
महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणा-या या कार्यक्रमास जिल्हा सहकारी बॅकेंचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, आ.किशारे दराडे, डॉ.सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डौले, विभागीय आयुक्त डॉ.प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी डॉ.सिध्दराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर आदिंसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विधान परिषदेत निवड झाल्याबद्दल आ.पंकजाताई मुंडे यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमास राहाता तालुक्यासह जिल्ह्यातूनही पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
पंचायत समितीच्या इमारती करीता ना.विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे १४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. या माध्यमातून आता सर्व सुविधांनी परिपुर्ण अशी इमारत विकसीत झाली असून, सर्व नागरीकांना याच नव्या कार्यालयातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ तसेच अन्य शासकीय कामही मार्गी लावण्यात मोठे सहकार्य होणार आहे. पंचायत समितीने यापुर्वीही लाभार्थी योजनांमध्ये केलेल्या यशस्वी अंमलबजावणीमुळे विभागीय, राज्यस्तरीय आणि देशपातळीवरील विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत.