कोल्हार ( वार्ताहर ) :– कोल्हार बुद्रुक येथे बेलापूर रस्त्यालगत शहानगर या उपनगरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडीची घटना घडली. घराच्या दरवाजाला कुलूप असल्याचे पाहून चोरट्यांनी डाव साधला. यामध्ये ५ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोकड असा अंदाजे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.
कोल्हारमध्ये एकाच आठवड्यात चोरीची ही दुसरी घटना आहे. विजय रोहिदास अडागळे हे कोल्हार – बेलापूर रोडलगत मधुकर साळुंके यांच्या बंगल्यामध्ये भाडेकरू म्हणून वास्तव्यास आहेत. विजय अडागळे व त्यांच्या पत्नी हे दांपत्य तीन – चार दिवसांपासून बाहेरगावी गेलेले होते. घराला कुलूप होते. गुरुवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरीची घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी अगोदर बंगल्याच्या वॉल कंपाऊंडच्या दरवाजाचे कुलूप तोडले. त्यानंतर त्यांनी श्री. अडागळे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप कटरच्या साह्याने तोडले व आत प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटाची उचकापाचक केली. त्यातून सोनसाखळी, अंगठ्या, लॉकेट, मंगळसूत्र, पळ्या, नथनी असे ५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. याशिवाय स्वयंपाक घरातील डब्यांची उचकापाचक केली. त्यातील एका डब्यामध्ये ठेवलेल्या ५० हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लांबविली. दागिने व रोख रक्कम मिळून असा अंदाजे एकूण ३ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला असल्याचे अडागळे यांनी सांगितले.
चोरीची घटना होत असतांना आजूबाजूला राहणाऱ्या कुणाच्याही लक्षात ही बाब आली नाही. सकाळी कुलूप तोडलेले आढळल्यानंतर हा प्रकार समजला. त्यानंतर शेजाऱ्यांनी अडागळे यांना झालेला प्रकार कळविला. यानंतर कोल्हार पोलिसांना खबर देण्यात आली. येथील सहाय्यक फौजदार बाबासाहेब लबडे आणि पोलिस नाईक संभाजी कुसळकर हे घटनास्थळी पोहचले व माहिती घेतली. पुढील तपास सुरु आहे.