लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-सहकाराची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणी बुद्रुक गावात सलग २४ व्या वर्षी एक गाव एक गणपती हा उपक्रम यशस्वीपणे राबवत ग्रामस्थांनी उत्साहात गणरायाचे स्वागत केले. महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे.
यंदाच्या वर्षी जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी सपत्नीक विधिवत पूजा करीत गणेश मूर्तीची स्थापना केली.राज्याचे महसूल,पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यावेळी उपस्थित होते.
ना.विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सन २००१ पासून लोणी बुद्रुक येथे एक गाव एक गणपती हा उपक्रम सुरू झाला आहे.गेली २४वर्षे येथे सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचेही आयोजन केले जाते.शनिवारी सकाळी प्रवरा शिक्षण संकुलातील शाळा,महाविद्यालयांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पद्मश्री डॉ.विखे पाटील महाविद्यालय येथून गणरायाची सवाद्य मिरवणूक काढून म्हसोबा मंदिर परिसरात आगमन केले.याच ठिकाणी ध्वज,लेझीम झांज आदी पथके आणि विविध नृत्याविष्काराचे सादरीकरण केले.हजारो विद्यार्थी आणि सेवक वर्गाच्या उपस्थितीने हा परिसर गजबजून गेला होता.ना.विखे व सौ.शालिनीताई विखे यांनी याप्रसंगी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
लोणी बुद्रुक ग्रामस्थांच्या उपस्थितीत गणेश मूर्तीची उत्साहात स्थापन झाली असून पुढचे काही दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धा पार पडणार असल्याने गणेश भक्तांसाठी ही मोठी पर्वणी असेल.