श्रीगोंदा( जनता आवाज वृत्तसेवा) :- भाजप सरकार हे रस्ते निर्मितीमध्ये सर्वात पुढे आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशात अनेक रस्ते नव्याने बनवले आहेत. सध्या महाराष्ट्रात भाजप आणि मित्र पक्षांची सत्ता असताना श्रीगोंदा तालुक्यात रस्त्यांसाठी हजारो कोटीनिधी मंजूर झाल्याच्या फक्त गप्पाच आहेत. प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता मात्र एकदम निकृष्ट आहे, अशी कुजबुज लोकांमधून ऐकायला मिळत आहे.
यानिमित्ताने जनता एकच प्रश्न विचारत आहे. आ. बबनराव पाचपुते ३५ वर्षे सत्तेत राहूनही तालुक्यातील रस्ते भकासच कसे? चांगले रस्ते दळणवळण व विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. असे असताना सहा महिन्यापूर्वी झालेले पक्के रस्ते पहिल्याच पावसाळ्यात उखडून निघतात रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी येतो.
मात्र निकृष्ट कामांमुळे जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचेच काम होतय का? लोकांना नुसत्या थापा मारून वेड्यात काढण्याचे काम जोरात सुरू असल्याच चित्र दिसत आहे. तंत्रज्ञान बदलले एक पिढी जाऊन दुसरी पिढी आली. पण थापा मारण्याची परंपरा मात्र कायम आहे, असा सूर जनसामान्य आळवताना दिसत आहेत.
यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे रस्त्यांना जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ता ही खसला आहे, अशा खराब रस्त्यांमुळे अनेक ठिकाणी अपघात झालेत. त्यामुळे नागरिकांना कायमचे अपंगत्व आले, लोकांची महागडी वाहने खराब झाली, दळणवळण कमी झाल्यामुळे विकास खुंटला सातत्याने निर्माण होणाऱ्या खराब रस्त्यांच्या या समस्या जनतेला भेडसावत आहेत. असे असताना सत्ताधाऱ्यांना पुन्हा सत्ता हवीय सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे चक्र सुरू असल्याच बोलले जात आहे, त्यात सामान्य जनता भरडली जात आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.
श्रीगोंदा तालुक्या शेजारील शिरूर, बारामती, कर्जत असे तालुके आहेत. या तालुक्यांमधील रस्त्यांची गुणवत्ता पाहिली तर रस्ते उत्कृष्टरित्या काम केलेले आहेत. मात्र श्रीगोंदा तालुक्यातील रस्ते उत्कृष्ट कधी बनणार? श्रीगोंदा तालुक्यामध्ये रस्त्यांचे चित्र वेगळेच दिसत आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची अर्धवट कामे आहेत. तर पूर्ण झालेले रस्ते सहाच महिन्यात पुन्हा खराब झाले आहेत.
रस्त्यांचा विकास कधी होणार? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. जनतेच्या विकासाच्या नावाखाली नेमका कोणाचा विकास चालू आहे? शहरात रस्त्यांसाठी ३३ कोटींचा निधी आला. पण ते काम कधी पूर्ण झालेच नाही, केलेल्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे असल्याचे नागरिक बोलत आहेत.
टक्केवारीचे राजकारण आता जनता ओळखायला लागलीय का? एकंदरीत ३५ वर्षे सत्तेत असूनही तालुक्यातील रस्ते भकास कसे? याला जबाबदार कोण? असा प्रश्न लोक विचारत आहेत. मदमस्त सत्ताधाऱ्यांची सत्तेची मस्ती आणि भुलथापांना जनताच मतपेटितुन उत्तर देणार? असे उघडपणे लोक बोलत आहेत.
टक्केवारीमुळे निधीचा वापर प्रत्यक्षात कामांसाठी नाहीच
तालुक्यामध्ये लाखो करोडोंचा निधी आला. परंतु टक्केवारीमुळे त्या निधीचा जनतेच्या कामांसाठी प्रत्यक्षात वापरच झाला नाही. त्यामुळे एक महिन्यापूर्वी बनवलेले रस्ते खराब झाले. यापूर्वी टक्केवारी घेऊन निधीचा वापर झालेले कधी आढळून आले नाही. काल झालेल्या दादांच्या वाढदिवसाला खूप गर्दी झाली. पण त्यामध्ये बहुतांश ठेकेदारच होते. त्यांच्याकडे आता सामान्य जनतेने पाठ फिरवली आहे. यावरून हेच दिसून येत आहे.
– साजन पाचपुते, उपनेते शिवसेना
विकासाच्या फक्त घोषणाच, कामांचा दर्जा शून्य
विकासाच्या घोषणा आम्ही १९८० पासून ऐकत आलो आहोत. यात नवीन काहीच नाही निधीचे आकडे ऐकायला मिळतात. परंतु कामाचा दर्जा शून्य आहे. जनतेला चांगल्या रस्त्यांची अपेक्षा आहे. मात्र येणारा निधी भ्रष्टाचारामध्ये जातो. विकासाचे चित्र कुठेच दिसत नाही, मोठ्या फसव्या घोषणा करण्यापेक्षा कामांच्या दर्जाला महत्त्व आहे, पण असं होत नाही.
– घनशाम शेलार, काँग्रेस नेते




