लोणी दि.१७( प्रतिनिधी):- लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध शाखांच्या सहभागातून आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि विश्वस्त सौ.शालीनीताई विखे पाटील यांच्या  संकल्पनेतून प्रवरेच्या शैक्षणिक संकुलामध्ये सुरु उन्हाळी शिबीरास विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
अशी माहिती संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे यांनी दिली.
    संस्थेकडून दि. १५ एप्रिल २०२३ ते २४ एप्रिल २०२३ या कालावधीत आयोजित केलेल्या उन्हाळी शिबीरामध्ये मुले  आणि मुली असे स्वतंत्र नियोजन केलेले आहे. त्यातील मुलांचा  प्रवरा पब्लिक स्कूल प्रवरानगर  तर मुलींसाठी प्रवरा कन्या विद्या मंदीर,लोणी येथील उन्हाळी शिबीरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.यामध्ये विविध मैदानी खेळ, मनोरंजनात्मक खेळ,कथा सादरीकरण,रायफल शूटिंग,विविध स्तोञ,बालसंस्कार,धनुर्विद्या,घोडसवारी,योगा, कराटे तायक्वांदो,पाॅटरी(मातीच्या वस्तू बनवणे),संगीत,गायन वनृत्य,विविध पाककला,बून फायर आणि गिर्यारोहण,इनडोअर व आउटडोअर गेम्स,जलतरण, श्लोक पठण,महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची माहिती आणि आपला ऐतिहासिक वारसा,रोबोटिक्स व कोडिंग अशा विविध उपक्रमांचे आयोजन केलेले आहे.
  प्रार्थना गायनाने व विविध स्तोत्र पठण आणि योगाने विद्यार्थ्यांच्या दिनक्रमाची सुरुवात होते.  मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. विद्यार्थ्यांची सुसज्ज व सर्व सुविधायुक्त वसतीगृहात निवासाची व्यवस्था केलेली आहे.सकाळी सहा वाजता उठल्यानंतर ६:३० ते सायंकाळी ८:३० पर्यंत विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यस्त ठेवले जाते. या  माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास,त्यांची जडणघडण व वैज्ञानिक दृष्टिकोन  निर्माण करून भविष्याची पूर्वतयारी करून घेतली जात आहे.
      आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले. शिबीर  नियोजनात प्रवरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ.बी.बी अंबाडे,प्रवरा गर्ल्स स्कुलच्या प्राचार्या भारती देशमुख दिप्ती आॅडेप,प्रा. शुभांगी रत्नपारखी,प्रा.गिरीश सोनार अथक परिश्रम घेत आहेत.
 प्रवरा संकुलात गुणवत्तापुर्ण शिक्षणांसोबत संस्कारक्षम शिक्षणांवर भर राहीला आहे.शहरी भागात मिळणा-या सर्व सुविधा येथे असल्याने शिस्तबध्द  उन्हाळी शिबीर म्हणून ओळख असल्याने यामध्ये राज्य भरातून विद्यार्थी सहभागी झाले आहेत.



