शेवगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचे आहे, त्या क्षेत्रात ज्येष्ठ व्यक्तींची ऊर्जा घेऊन आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवा केली असे स्व. मारुतरावजी घुले पाटील हे ज्येष्ठ ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते, त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन व तीच परंपरा घुले परिवाराने पुढे चालू ठेवली आहे, असे प्रतिपादन देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांनी केले.
लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव येथे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा स्व. मारुतराव घुले पाटील स्मृती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या वेळी भास्करगिरी महाराज बोलत होते.
यावेळी बोलताना भास्करगिरी महाराज पुढे म्हणाले की, घुले पाटील यांच्या जयंती निमित्ताने घुले कुटुंबाने सर्व जातीधर्माचा, पंथांचा, सन्मान केला हेच आपले कर्तव्य आहे.
स्व. घुले यांनी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत सहकारमहर्षी म्हणून नावलौकिक मिळवला, ते ज्येष्ठांमध्ये ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते.त्यांनी भेंडा येथे कारखान्याची निर्मिती केली तसेच अनेक विकासाची दालने खुली करून गोरगरीब जनतेला विचारांची दिशा दिली. हा त्यांचा वारसा मा. आ. डॉ. नरेंद्रघुले, मा. आ. चंद्रशेखर घुले व क्षितिज घुले हे पुढे चालवत आहेत.
यावेळी माजी आमदार नरेंद्र घुले म्हणाले की, शेवगाव तालुक्याच्या एका बाजूला पैठण नाथ सागर असून, ही नाथ महाराजांची भूमी आहे तर दुसऱ्या बाजूला नेवासा येथे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिलेली पुण्यभूमी आहे.
याच पुण्यभूमीत स्व.मारुतराव घुले पाटील यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा केली, तोच वारसा घेऊन आम्ही घुले कुटुंब तुमच्या साथीने पुढे घेऊन जात असून, त्यांचे अपुरे राहिलेले स्वप्न चंद्रशेखर घुले यांच्या हातून पूर्ण करण्यासाठी जनतेने साथ द्यावी. असे आवाहन माजी आ. डॉ. नरेंद्र घुले पाटील यांनी या वेळी केले.



