श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा):- शहरातील कालव्या नजीक असलेल्या जयस्वाल हॉस्पिटल जवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाली. यात इलेक्ट्रीक स्कुटीवरील आई व मुलगा जखमी झाले असून मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, काल सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास जयस्वाल हॉस्पिटलपासून श्रेयस विक्रांत महाले व सोनल विक्रांत महाले हे मायलेक त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकीवर आपल्या घराकडे वळत असताना समोरून यमाहा कंपनीच्या आरवन मोटारसायकलवरुन आलेल्या मयुर सोनार या दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक दिली. यात श्रेयस याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर सोनल या ही जखमी झाल्या. धडक इतकी जोरात होती की, दोन्ही दुचाकींची मोडतोड झाली होती. त्या दोन्ही दुचाकी ओळखत नव्हत्या. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी झाली होती. जमलेल्या नागरिकांनी जखमींना उपचारासाठी येथीलच जवळ असलेल्या साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने श्रेयस व सोनल महाले यांना तातडीने नगर येथे हलविण्यात आले आहे. तर ज्या दुचाकी ने धडक दिली त्यावरील मयूर सोनार याला किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर तो साखर कामगार रुग्णालयातून पसार झाला.
अपघातस्थळी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दीपक मेढे व कर्मचार्यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी तुटलेल्या अपघातातील दुचाकी ताब्यात घेतल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.