कोल्हार ( वार्ताहर ) :- आप्पासाहेब पाडुरंग वराळे यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये आपल्या २९ वर्षांच्या शिक्षक सेवा कालखंडात असंख्य सुसंस्कृत विद्यार्थी घडविले. त्यांनी गुहा, चिंचोली, फत्याबाद, पाथरे आदि ठिकाणी सर्वोत्तम ज्ञानदान सेवा दिली. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी उर्वरित आयुष्यात समाजकार्यासाठी वेळ द्यावा असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
राहुरी तालुक्यातील गुहा येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आप्पासाहेब पांडुरंग वराळे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सौ. विखे पा. बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक केशवराव कोळसे होते. याप्रसंगी राहुरी तालुका दुध संघाचे अध्यक्ष ॲड. तानाजीराव धसाळ, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. एल. बी. सरोदे, राजेंद्र कोळसे, दत्तात्रय कोळसे, बबनराव कोळसे, महेश पाटील, अशोक गागरे, नंदकुमार दळे, रवींद्र म्हसे, सौ. वनिता आप्पासाहेब वराळे, कु. अपूर्वा वराळे, अनुराग वराळे, प्रा. शरद मुसमाडे, सौ. संगीता मुसामाडे, शुभम मुसमाडे आदि उपस्थित होते.
यावेळी सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते श्री. व सौ. वराळे दाम्पत्याचा कुटुंबीयांसमवेत यथोचित सत्कार करून गौरव करण्यात आला. त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आप्पासाहेब वराळे यांच्या शिक्षण सेवाकार्याचा शब्दरूपी गौरव केला.




