दुर्गापूर (जनता आवाज वृत्तसेवा):- रक्ताच्या व प्रेमाच्या नात्याची घट्ट वीण असलेले व ग्रामदैवत दुर्गामातेच्या छायेतील श्रीसाई समकालीन सिद्धपुरुष सद्गुरू आनंदबाबा यांच्या पद्स्पर्शाने पुनित झालेले महाराष्ट्रातील एकमेव गाव दुर्गापूर ता. राहाता जि. अ.नगर. दक्षिणेला प्रवरामाई, उत्तर- पूर्वेला वाघ ओढा व पश्चिमेला पाट. नेहमी शेजारून पाणी वाहत असणारे प्रवरेचे शंभर वर्षांपूर्वीचे अंदमान, म्हणजे आमचे दुर्गापूर गाव. शे पाचशे वस्ती व पाऊसपाणी बागायती असलेल्या गावातील म्हाळू हरी पुलाटे व हौशाबाई पुलाटे यांच्या पोटी मुरलीधर या मुलाचा जन्म झाला.चार मुले, तीन मुली व हाताशी दहावीस बिघे पाऊस पाणी ओलीत जमीन. त्यामुळे कष्ट आणि गरिबी सोबत घेऊन जीवन जगणारा हा परिवार. शाळा शिक, नाहीतर मागशील भिक ही भीती मुरलीधराला शाळेच्या वाटेला लावणारी ठरली.
गावातले जीवन शिक्षण संपवून छोटा मुरलीधर तीन चार कोस पायी ऊन, वारा, पाऊस झेलीत लोणीला दररोज ये- जा करत माध्यमिक शिक्षण घेऊन नगरच्या कॉलेज मधून पदवीधर झाला.याच दरम्यान बुडती हे जन न देखावे डोळा या वृत्तीने वेडे होऊन लोणीच्या शहाण्या पाटलाने इतर शहाण्यांची एकत्र मोट बांधली व उजाड माळरानावर शेतकऱ्यांच्या उद्धाराचे व सहकारातून समृद्धीकडे या तत्वाच्या आधाराने पदमश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांनी विकासाचे स्वप्न साकारले. या स्वप्न पूर्तीने मुरलीधर पुढे मा.एम.एम.पुलाटे साहेब झाले.ज्या प्रवरा सहकारी साखर कारखान्यात स्वतःच्या व इतरांच्या रानातील गरिबीमुळे ऊस तोडणी करणाऱ्या माणसाचा मुलगा त्याच साखर कारखान्यात अकाऊंटंट जनरल मॅनेजर मॅनेजिंग डायरेक्टर व शेवटी डायरेक्टर होणे ही आशिया खंडातील पहिल्या प्रवरा सहकारी साखर कारखान्यातील जगातील पहिली घटना पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या शोधक नजरेने त्यांनी घडविली व त्याचे पुलाटे साहेबांनी सोने केले.
खासदार साहेब व पुलाटे साहेब प्रेम व एकनिष्ठता यांचा एक आदर्श वस्तूपाठ. कारखाना सेवा काळात स्वतः गरिबीचे चटके सोसले असल्याने परिसरातील शेतकरी कामगार यांच्या प्रश्नाची सोडवणूक करणे हे ते आद्य कर्तव्य समजत त्यामुळे त्यात कमतरता राहिली तर ते संबधितास खडसावत. त्यामुळे त्यांची शिस्तप्रियता काहींना आवडत नसे पण त्यांनी तत्व सोडले नाही.पुढे प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली तेथेही त्यांनी दुःखाचे माहेरपण करणाऱ्या कुलपती डॉ राजेंद्र विखे पाटील ,सौ. सुवर्णाताई विखे पाटील व व्यवस्थापनाला रुग्णहिताच्या निर्णयात व कार्यात सकारात्मक सहभाग घेतला.
पायरेन्स या समाजिक संस्थेचा अध्यक्ष या नात्याने जबाबदारी निभावताना आदरणीय लोकनेते स्व.खासदार बाळासाहेब विखे पाटील, माजी मंत्री श्री.आण्णासाहेब म्हस्के पाटील, महसूल मंञी ना. डाॅ.राधाकृष्ण विखे पाटील, जि प अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, मा. खासदार श्री. सुजयदादा विखे पाटील यांच्या मनातील जन सामान्यांच्या विकासाचे शेतकरी, महिला, युवक यांना बरोबर घेऊन वाटचाल करण्याचे स्वप्न पूर्तीसाठी व जागतिक ज्ञानाशी जोडले जाण्यासाठी लोकल ते ग्लोबल अशा अनेक समाजिक उपक्रमाची सुरुवात केली. त्यापैकी प्रवरा कम्युनिटी रेडिओ या द्रष्ट्या माणसांच्या कल्पनेतून व मार्गदर्शनातुन सुरुवात केली.त्यामुळे ‘ नाते जळवू या मातीच्या मनाशी ‘ ही संकेतधून शब्द रचनेचे भाग्य मला लाभले.या त्यांच्या जीवन प्रवासात त्यांच्या संपर्कात आलेल्या माणसांना त्यांनी कधी अंतर दिले नाही तर आधारच दिला. त्यामुळे प्रवरा परिवारात त्यांना आदरच मिळाला.त्यावर त्यांच्या जीवनाला आदर्श जीवन म्हणून गौरविण्याचा प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती आरोग्य महर्षी डॉ राजेंद्र विखे पाटील यांचा जीवन गौरव पुरस्कार देवुन गौरविण्याचा निर्णयाने शिक्कामोर्तब केले.ही घटना सर्व शेतकरी कामगार व दुर्गापूरकर बंधुभगिनी व प्रवरा परिवारासाठी आनंदाची समाधानाची व अभिमानाची अशी आहे
कारण एक शेतकरी ऊसतोडणी मजुराचा मुलगा ते प्रवरा अभिमत विद्यापीठ जीवन गौरव पुरस्कार सन्मानार्थी हा माझे मार्गदर्शक आदरणीय श्री एम एम पुलाटे साहेब यांना मिळणे ही बाब प्रवरा परिवाराचे वेगळेपण आहे. साहेब आपले हार्दिक अभिनंदन व आपणास हार्दिक सदिच्छा. आपल्या सर्वांच्या वतीने दुर्गापूरकरांच्या वतीने प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ राजेंद्र विखे पाटील तथा प्रवरा परिवाराचे तात्या व प्रवरा अभिमत विद्यापीठ व्यवस्थापन मंडळास खूप खूप धन्यवाद.
कवी.यशवंत पुलाटे, जेष्ठ ग्रामीण साहीत्यिक
दुर्गापूर ता.राहाता.



