लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):- लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरानगर येथील प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजी आजोबा स्नेहमेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला. या स्नेह मेळाव्यास आजी आजोबांनी भरभरून प्रतिसाद दिला. अशी माहिती शाळेचे प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे यांनी दिली.
प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये नवनवीन उपक्रम नेहमीच राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आजी-आजोबांचा स्नेहमेळावा घेण्यात आला. या स्नेह मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी व निवृत्त शिक्षक दिलीप घोलप, सौ. लतिका इनामके, तसेच विशेष मान्यवरांमध्ये बाजार समितीचे माजी सभापती तुकाराम पाटील बेंद्रे, बापूसाहेब आहेर, अशोक आहेर , दादा पाटील घोगरे आदी उपस्थित होते.
या स्नेह मेळाव्यात शाळेची विद्यार्थिनी कु. शिव्वण्या अनाप कु. रुद्राणी तांबे यांनी मनोगत व्यक्त केली. तर प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी नृत्याचे सादरीकरण केले व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी “आजी आजोबा काळाची गरज” या नाटिकेतून आजी आजोबांचे महत्त्व चित्रित केले. प्रमुख पाहुणे घोलप यांनी आपल्या भाषणातून शालेय विद्यार्थ्यांना संस्काराचे महत्त्व सांगितले. त्याचबरोबर सौ. लतिका इनामके. सौ. सुनंदा रनावरे,श्री. गोरे ,आढाव या आजी आजोबांनी आपली मनोगते मांडली. तर सौ. म्हसे आजी यांनी भजन गीताचे गायन करून प्रेक्षकांचे विशेष मनोरंजन केले. शाळेच्या वतीने एल के जी ते इयत्ता दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांसाठी विशेष मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन केलेले होते. त्या खेळांमध्ये सर्व आजी आजोबांनी आपला उस्फुर्त प्रतिसाद नोंदवून आनंद लुटला.
याप्रसंगी शाळेचे प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे, उपप्राचार्य श्री. के टी अडसूळ, पर्यवेक्षिका सौ. एम एस जगधने, सौ. शुभांगी रत्नपारखी इ. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एम बी अंत्रे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे समन्वयक जी एफ मनियार यांनी केले.



