spot_img
spot_img

मतदारसंघात सुरु असलेली विकासाची प्रक्रीया शेजारच्‍यांना आता देखवत नाही- ना. राधाकृष्ण विखे पाटील

राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):-आपल्‍या मतदार संघात सुरु असलेली विकासाची प्रक्रीया शेजारच्‍यांना आता देखवत नाही. त्‍यांना मंत्रीपदाची संधी मिळाली पण निर्णय करता आले नाहीत. आपण महसूल मंत्री पदाच्‍या काळात सामान्‍य माणसाच्‍या हिताचे निर्णय घेतले. जिल्‍ह्याच्‍या आणि मतदार संघाच्‍या विकासासाठी प्रकल्‍प आणले. याची जेलसी आता शेजारच्‍यांना झाली आहे. त्‍यामुळेच येथे येवून आपली विकासाची घडी उध्‍वस्‍त करण्‍यासाठी आणि सामान्‍य माणसाच्‍या प्रपंचाला गालबोट लावण्‍याचे करीत आहेत. अशा बोलघेवड्या पुढा-यांना धडा शिकविण्‍याचे काम तुम्‍हाला आता करायचे आहे असे रोखठोक प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

राहाता शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ आणि विविध योजनांच्‍या लाभार्थ्‍यांना साहित्‍य वितरणाच्‍या कार्यक्रम मंत्री विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न झाला. याप्रसंगी बोलतांना पालकमंत्री म्‍हणाले की, मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांच्‍या जीवनात नवी उभारी देण्‍याचे काम महायुती सरकारने केले आहे. मात्र या योजनेला बदनाम करण्‍याचे काम महाविकास आघाडीकडून केले जात आहे. योजना बंद पाडू म्‍हणणा-यांना आता दारातही उभे करु नका असे आवाहन करुन, महायुतीचे सरकारच सत्‍तेवर येणार आहे. या योजनेचे अनुदानात वाढ करणार असल्‍याची ग्‍वाही त्‍यांनी दिली.

राज्‍य सरकारने मुख्‍यमंत्री बळीराजा योजनेतून ४३ लाख शेतक-यांचे वीजबिल माफ केले असून, मुलींना व्‍यवसायिक शिक्षणही मोफत देण्‍याचा निर्णय घेतला आहे. आपल्‍या तालुक्‍यात एक रुपयात पीक विमा योजनेत ८७ हजार शेतक-यांना १२२ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले असून, ३८ हजार शेतक-यांना १० कोटी रुपयांचे अनुदान दिले गेले आहे. गेली अनेक वर्षे सुरु असलेल्‍या खंडकरी शेतक-यांच्‍या लढ्याला यश आले असून, या शेतक-यांच्‍या जमीनी विनामुल्‍य वर्ग १ करुन देण्‍यात आल्‍या आहेत. शेती महामंडळाची जमीन औद्योगिक वसाहतीला उपलब्‍ध करुन दिली असून, या ठिकाणी आता मोठे उद्योग उभे राहणार असल्‍याने तालुक्‍यात रोजगाराची मोठी संधी मिळणार आहे.

निळवंडे कालव्‍यावरुन सातत्‍याने आपली बदनामी केली गेली. मात्र २०२४ ला पाणी देणार हा शब्‍द मी दिला होता. तो पुर्ण झाला आहे. समन्‍यायी पाणी वाटप कायद्याचे भूत या जिल्‍ह्यावर शेजारच्‍याच नेत्‍याने आणून बसविले. आज जायकवाडी भरल्‍याचे समाधान आहे. मात्र भविष्‍यात कायमस्‍वरुपी हा जिल्‍हा दुष्‍काळमुक्‍त करण्‍यासाठी पश्चिम वाहीनी नद्यांचे पाणी पुर्वेकडे वळविण्‍यासाठी महायुती सरकारने काम सुरु केले असून, गोदावरी कालव्‍यांच्‍या नुतणीकरणासाठीच युती सरकारने १९१ कोटी रुपये मंजुर केले आहेत.

सावळीविहीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय, अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी कार्यालय, विमानतळाची होणारी नवीन इमारत या सर्व विकास प्रकल्‍पांमुळे आपल्‍या मतदार संघातील पुढच्‍या पिढीचे भवितव्‍यच अधिक यशस्‍वी होणार आहे. मात्र ही प्रगती पाहावत नसणारेच आता येथे येवून जनतेची दिशाभूल करीत आहेत. या बोलघेवड्या पुढा-यांचे तालुक्‍यासाठी योगदान तरी काय असा प्रश्‍न उपस्थित त्‍यांनी उपस्थित केला.

याप्रसंगी माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांचे भाषण झाले. विविध लाभार्थ्‍यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्‍यात आले. तसेच विविध विकास कामांचे भूमिपुजन आणि उद्घाटन ना.विखे पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!