5.4 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

ग्रामीण साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिकांसाठी व्यासपीठ- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलराज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन

सोलापूर, दि. 08, ( प्रतिनिधी) :- सोलापूर जिल्ह्याला आध्यात्म व साहित्याचा मोठा वारसा लाभलेला आहे. संतांचे अभंग, सावता माळी, सिद्धेश्वर यांचे वचन, राम जोशी यांची शाहिरी सोलापूरला लाभले, संत साहित्य लेखकांची आणि संतांची भूमिका जिल्ह्याची संस्कृती मोठी करणारी आहे.
 साहित्यिक क्षेत्रात सोलापूरचे मोठे योगदान असून, या भूमिमध्ये अनेक संत साहित्यिक होवून गेले. ग्रामीण साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ग्रामीण साहित्यिक व कवींसाठी व्यासपीठ निर्माण होणार असून, साहित्य संमेलनात नवीन साहित्यिकांना संधी उपलब्ध होत आहे हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
सांगोला येथे आयोजित राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्या मंदिर प्रशाला येथे आयोजित या संमेलनास खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार सर्वश्री दीपक साळुंखे पाटील आणि प्रशांत परिचारक, संमेलनाध्यक्ष इंद्रजीत भालेराव, उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब संमिदर, अ‍ॅड. मिलिंद थोबडे, प्रा. प्रबुध्दचंद्र झपके उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मराठी अत्यंत जुनी भाषा आहे. मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी अनेकांनी योगदान दिले आहे. महाराष्ट्र तर संतांची भूमि आहे. संत साहित्याने अध्यात्मिक लोकशाहीची परंपरा जोपासली आहे. तसेच संतांनी विषमता दूर करण्याची भूमिका घेतली आहे. ग्रामीण साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ग्रामीण साहित्यिक व कवींसाठी व्यासपीठ निर्माण होणार असून, साहित्य संमेलनात नवीन साहित्यिकांना संधी उपलब्ध होती आहे, हे कौतुकास्पद आहे. वाचकांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे वास्तववादी लिखाणातून नवी दृष्टी देण्याची गरज आहे. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून चांगल्या विचारांची देवाणघेवाण होणार असून साहित्य संमेलन परिवर्तनांची नांदी ठरेल, असा विश्वासही पालकमंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला. 
संमेलनाध्यक्ष इंद्रजीत भालेराव म्हणाले, अनेक साहित्यातून माणदेशाची संस्कृती पुढे आली आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे दाखल केलेले पुरावे हे ग्रामीण साहित्यातील आहे. त्यामुळे ग्रामीण साहित्याने मराठी भाषेला मोठी उंची निर्माण करून दिली आहे. शेतकऱ्याची गाणी ही सर्वात जुनी मराठी भाषा आहे. सातवाहन काळापासून ते आजपर्यंत शेतकरी गीत हे मराठी साहित्यातील सर्वात जूने साहित्य आहे. गावगाडा तुटलेला असल्यामुळे शेतकरी आज हवालदिल झाला आहे. तो गावगाडा नव्या युगाने पूर्णपणे तोडून टाकला आहे. त्यामुळे पौष्टिक आहार व चांगली माणसे मिळाली तर शेतकरी आत्महत्या करणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाषा जपली पाहिजे, भाषा जतन केली पाहिजे व वाढविली पाहिजे. भाषेवरुन आता माणसांची ओळख होऊ लागली आहे. भाषा आणि साहित्य हे संलग्न असून भाषेची सर्वात जास्त ताकद आहे. भाषेसारखे शस्त्र कुठल्याही देशाला तयार करता आले नाही, असे सांगत यापुढील काळात मराठी भाषेची चळवळ खेडोपाडी पोहोचली पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. 
प्रारंभी सांगोला शहरातून ग्रंथदिंडी आयोजित करण्यात आली. या ग्रंथदिंडीचे उद्घाटन आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थी, लेझीम पथक, झांज पथक, ध्वज नृत्य, झेंडा गीत, वारकरी, एन.सी.सी. विद्यार्थी हे ग्रंथदिडींचे खास आकर्षण होते. शहरातील प्रमुख मार्गावरुन सदरची दिंडी काढून रॅलीचा समारोप संमेलनस्थळी करण्यात आला.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!