कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा ):- कोल्हार बुद्रूक ग्रामपंचायतीला सार्वजनिक प्रयोजनासाठी राज्य शेती महामंडळाची जमीन देण्याच्या महत्वपूर्ण निर्णयास राज्य मंत्रीमंडळाने मान्यता दिली असून, यापुर्वी निमगाव को-हाळे येथील जमीनही क्रिडा संकुलाच्या उभारणीसाठी विनामुल्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहीती महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या जमीनी गावठाण विस्तार, शासकीय घरकुल योजना, घनकचरा व्यवस्थापन किंवा पाणी पुरवठा योजना अशा सार्वजनिक प्रयोजनार्थ देण्याची मागणी सातत्याने होत होती. राज्य सरकारने याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेवून शेती महामंडळाच्या जमीनी सार्वजनिक प्रयोजनासाठी देण्याचा निर्णय ११ मार्च मार्च २०२४ रोजी घेण्यात आला होता.
कोल्हार बुद्रूक ग्रामपंचायतीनेही राज्य सरकारकडे महामंडळाच्या जमीनीची मागणी केलेली होती. तसा प्रस्तावही राज्य सरकारकडे सादर करण्यात आला होता. राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील शेती महामंडळाच्या गट नंबर ३०६ मधील ४ हेक्टर जमीन ग्रामपंचायत कोल्हार बुद्रूकला सार्वजनिक प्रयोजनासाठी विनामुल्य देण्याच्या निर्णयास राज्यमंत्रीमंडळाने मान्यता दिली असल्याचे मंत्री ना.विखे पाटील यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे निमगाव को-हाळे येथील शेती महामंडळाच्या गट नंबर १८८/१ मधील ५.४८ हेक्टर क्षेत्र क्रिडा संकुल उभारण्याकरीता श्री.साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांनाही सार्वजनिक प्रयोजनार्थ विनामुल्य देण्याचा निर्णय यापुर्वीच राज्य सरकारने घेतला असल्याची माहीतीही ना.विखे पाटील यांनी दिली. या परिसरात क्रिडा संकुल उभारले जाणार असल्याने अंतरराष्ट्रीय क्रिडा स्पर्धांचे आयोजनही करणे शक्य होईल व ग्रामीण भागातील खेळांडूनाही प्रोत्साहन मिळेल या विचाराने राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल ना.विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीत पवार यांचे आभार मानले आहेत.



