अहिल्यानगर ( जनता आवाज वृत्तसेवा):- विधानसभा निवडणूक भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे आणि आदर्श आचारसंहितेचे कटाक्षाने पालन होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विधानसभा निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, सर्व समन्वयक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झाल्यावर शासकीय इमारत परिसरातील जाहीरात परिसर, फलक काढावेत आणि आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथकांची नियुक्ती करावी. सीव्हीजील ॲपवर येणाऱ्या तक्रारींच्या निवारणासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना त्याची माहिती देण्यात यावी. मुद्रणालयांच्या प्रतिनिधींची बैठक घेवून नियमातील तरतूदींची माहिती द्यावी.
जिल्हास्तरावर आणि निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावरील नियंत्रण कक्ष २४x७ सुरू ठेवावेत. आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याबाबत बँक अधिकाऱ्यांची बैठक घेवून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना द्याव्यात. स्ट्राँगरुमची व्यवस्था निटपणे तपासून घ्यावी. पोलीसांचे निवडणूक विषयक प्रशिक्षण त्वरीत घेण्यात यावे. विविध परवानग्या देण्यासाठी ऑनलाईन व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीत निवडणूक प्रशिक्षण, वाहतूक आराखडा, ईव्हीएम व्यवस्थापन, आदर्श मतदान केंद्र आदी विषयांबाबत आढावा घेण्यात आला.