कोल्हार ( वार्ताहर ) :- कोल्हारहुन अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील मांडवे फाटा येथे गुरुवारी बंद घरचे कुलूप तोडून घरफोडी झाली. यामध्ये सुमारे ४३ हजारांचा मुद्देमाल व रोख रक्कम चोरांनी लंपास केली. सदर घटना भरदिवसा दुपारच्या सुमारास घडली.
या संदर्भातील फिर्याद किशोर लहानू नेहे (रा. मांडवे फाटा, ता. श्रीरामपूर) यांनी दिली आहे. फिर्यादी लहाने यांच्या पत्नी शाळेत कामासाठी गेल्या होत्या तर ते स्वतः दुपारी एकच्या दरम्यान राजुरी शिवारात असलेल्या शेतीवर गेले होते. घरातील सर्वजण बाहेर गेल्याने दरवाजाला कुलूप होते. कुलूप तोडून चोरांनी उचकपाचक करून कपाटातील लॉकरमधील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले.
कुणीतरी पाळत ठेऊन सदर घरफोडी केल्याचे प्रथदर्शनी दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच लोणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणीचे सपोनि आठरे यांचे मार्गदर्शनावाखाली पो ना नेहुल करीत आहेत.