भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिर्डी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रमुख मार्गावरुन मंत्री विखे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी गौरव यात्रा काढून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा तिव्र शब्दात निषेध केला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, अभय शेळके, शहर अध्यक्ष सचिन शिंदे, कैलास कोते, मुकूंदराव सदाफळ, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, स्वानंद रासणे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याचा कोणताही इतिहास माहित नसलेले राहुल गांधी सावरकरांप्रती बेताल वक्तव्य करुन, प्रसिध्दी मिळवित आहेत. सवंग लोकप्रियतेसाठी त्यांनी केलेले वक्तव्य म्हणजे संपूर्ण देशाचा अपमान आहे. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणा-या व्यक्तिंप्रती अपमानास्पद वक्तव्य करुन तुम्ही भारत जोडत आहात की तोडत आहात? असा सवाल त्यांनी केला.
सावरकरांचे बलिदान हा देश कधीही विसरु शकणार नाही. अंदमानच्या तुरुंगात त्यांना ज्या पध्दतीने वागविले गेले तो इतिहास अंगावर शहारे आणणारा आहे. पण हा इतिहास ज्यांना ज्ञात नाही ते कॉंग्रेसचे नेते स्वातंत्र्य लढ्यात योगदान देण्या–यांप्रती प्रश्नचिन्ह उपस्थित करुन, राजकारण करतात अशी टिका करुन विखे पाटील यांनी सांगितले की, सावरकरांप्रती वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मणिशंकर अय्यर यांना रस्त्यावर उतरुन जोड्याने मारणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कुठे आणि सत्तेसाठी त्याच कॉंग्रेस नेत्यांना पायघड्या घालणारे उध्दव ठाकरे कुठे याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
उध्दव ठाकरे आणि कॉंग्रेसमध्ये सत्ता गेल्याची वैफल्यग्रस्तता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असल्याने बेताल विधानं करुन, सामाजिक, राजकीय वातावरण कलुशित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतू हा अपमान सहन न करता सावरकरांचा गौरव करण्याचा प्रयत्न यात्रेच्या निमित्ताने भाजपने सुरु केला असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या यात्रेत भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.