*श्रीरामपूर (प्रतिनिधी) :-महाराष्ट्र दौऱ्यावर असताना आणि सतत काँग्रेस नेते राहुल गांधी हे सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करुन प्रसिध्दी मिळवीत आहे. जोपर्यंत राहुल गांधी आणि काँग्रेस माफी मागत नाही तो पर्यंत भाजपा- सेना – रिपाई चे हे आंदोलन चालूच राहील.
जर त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांना पळता भुई थोडी करु असा इशारा महसूल मंत्री व नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिला.
स्वा. सावरकर गौरव यात्रेच्या निमित्ताने श्रीरामपूर येथील आयोजित सभेत ते बोलत होते. तत्पूर्वी ना. विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरात फटाक्यांची आतषबाजी करीत सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात मोठ्या संख्येने स्त्री पुरुष कार्यकर्ते व सावरकर प्रेमी नागरिक सहभागी झाले होते.
ना. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले की, स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच हिंदुत्व आणि देशभक्तीशी तडजोड केली नाही. परंतु उध्दव ठाकरे यांनी सत्तेच्या लाचारीसाठी सावरकर आणि हिंदुत्वाचा विचार सोडून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. त्यांचा हा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही. त्यामुळे ठाकरे आणि काँग्रेसचे खरे रूप पुढे येत आहे. उध्दव ठाकरे यांनी नेमकी सावरकर आणि हिंदुत्वाबद्दलची खरी भुमिका जाहीर करण्याचे आवाहनही विखे पाटील यांनी केले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन प्रस्ताविक केले.
तर जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी आभार मानले.
यावेळी भाजपचे उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, माजी सभापती नानासाहेब पवार, जी.प.सदस्य शरद नवले,शहराध्यक्ष मारुती बिंगले, उपाध्यक्ष चंद्रकांत परदेशी, सुनिल साठे,महिला तालुका भाजप उपाध्यक्ष रेखाताई रेंगे, तालुका भाजप उपाध्यक्ष डॉ. शंकर मुठे, रिपाईचे अध्यक्ष भीमाभाऊ बागुल, भटक्या जाती जमाती तालुका उपाध्यक्ष विठ्ठल राऊत, शिवसेना उत्तर नगर जिल्हा युवा सेना प्रमुख शुभम वाघ, तालुका प्रमुख बापुसाहेब शेरकर, तालुका युवा प्रमुख संदीप दातीर, संतोष वायकर यांच्यासह भाजप,शिवसेना व रीपाईचे पदाधिकारी व स्त्री पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवाजी चौकातून फटाक्यांची आतषबाजी करीत सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. ना. विखे यांनी नगर परिषदेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आणि आझाद मैदानावरील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
हिंदूचे धर्मांतर, लव जिहादच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. याबाबत आपण आज नगरच्या बैठकीत पोलीस अधीक्षकाकडे स्पष्ट भूमिका मांडली. अशा घटना घडल्या तर संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल असेही पालकमत्र्यांनी यावेळी जाहीर इशारा दिला.