लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- शिर्डी विधानसभा मतदार संघ हा सातत्याने विकासाच्या वाटेने जात आहे. ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरु असलेली ही विकास प्रक्रीया अधिक पुढे घेवून जाण्यासाठी त्यांना पाठबळ देणे गरजेचे आहे. भविष्यात शिर्डी येथे विकसीत होत असलेला औद्योगिक वसाहतीचा प्रकल्प युवकांच्या भवितव्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ लोणी बुदूक येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला. माजी मंत्री आण्णसाहेब म्हस्के पाटील, नंदू राठी, सरपंच कल्पना मैड, अशोकराव धावणे, किसनराव विखे, अनिल विखे, विजय लगड, गणेश विखे, चांगदेव विखे, यांच्यासह ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात सौ.विखे पाटील म्हणाल्या की, या भागातील विकास प्रक्रीयेला ना.विखे पाटील यांनी पुढे घेवून जाण्याचाच यशस्वी प्रयत्न केला. पद्मश्रींनी सहकार चळवळ सुरु केली. त्या माध्यमातून या भागात शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा उभ्या राहील्या. काळाच्या ओघात या विकास प्रक्रीयेला नवी दिशा देण्याचे काम ना.विखे पाटील यांच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले.
महायुती सरकारने समाजातील सर्व घटकांना योजनांचा लाभ दिला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आधार सर्व महीला भगिनींना मिळाला आहे. युवक आणि शेतक-यांसाठी सरकार योजना यशस्वीपणे राबवून त्याचा लाभ सर्वांना मिळवून दिला आहे. ना.विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे शिर्डी येथे विकसीत होत असलेली औद्योगिक वसाहत युवकांच्या हितासाठी नवी दिशा देईल. युवकांना मोठे रोजगार या माध्यमातून निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी या विधानसभा मतदार संघातून सात वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांनी केलेल्या कामावर जनतेने कायमच विश्वास ठेवून त्यांना पाठबळ दिले आहे. यंदाची त्यांची ही निवडणूक एैतिहासिक करण्यासाठी मताधिक्याचा उच्चांक करावा असे आवाहन मतदान घडवून आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने आपल्या प्रभागामध्ये काम करण्याचे त्यांनी सुचित केले.