कोल्हार ( वार्ताहर ) :– कोल्हार भगवतीपूर येथे प्रतीवर्षीप्रमाणे महावीर जयंती हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यासह संतांचे व्याख्यान, मुला – मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम होऊन गौतमी प्रसादीने कार्यक्रमाची सांगता झाली.
काल मंगळवारी सकाळी कोल्हार भगवतीपूर येथील स्वामी मुनिसुव्रत मंदिरापासून भगवान महावीरांच्या प्रतिमेची रथातून पारंपारिक वाद्यांसह मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये समस्त जैन बांधव, महिला – पुरुष, युवक – युवती सहभागी होते. गावातून निघालेली मिरवणूक नवीन जैन स्थानकात पोहचल्यानंतर विविध कार्यक्रम संपन्न झाले.
जैन स्थानकात आचार्य विजय रविशेखर सुरीश्वरजी महाराज तसेच साध्वी गुरुस्मिताजी महाराज यांचे व्याख्यान झाले. येथील आनंद जैन पाठशाळेच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. वर्षभर जैन समाजाच्या होत असलेल्या विविध कार्यक्रमांना सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मंगलपाठ झाल्यानंतर गौतमी प्रसादीने कार्यक्रमाची सांगता झाली.
याप्रसंगी शिर्डी साईबाबा संस्थानचे माजी उपाध्यक्ष सुरेश वाबळे, कोल्हारचे माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे, उद्योजक डी. बी. जगताप, संपतराव कोळसे, राजेंद्र कुंकुलोळ, अजित कुंकुलोळ, स्वप्निल निबे, अजित मोरे, संजय शिंगवी, अशोक आसावा, ज्ञानेश्वर खर्डे, सुधीर आहेर, महेंद्र कुंकुलोळ, संतोष रांका, संजय रांका, श्रीकांत खर्डे, जितेंद्र खर्डे आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोल्हार जैन स्थानकाचे संघपती नंदकुमार भटेवरा यांनी केले. सूत्रसंचालन सुशांत रांका, महेंद्र रांका व डॉ. पायल रांका यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जैन श्रावक संघाचे आनंद रांका, निलेश शिंगवी, योगेश मुथ्था, अतुल रांका, आनंद सुराणा, जितेश कुंकूलोळ, हेमंत रांका, सुरेश कुंकूलोळ सर्व सदस्य प्रयत्नशील होते.




