12 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

आ.थोरात हे कर्तृत्वाने राज्यात ओळखले जातात – आ.अमित देशमुख आ. थोरात यांच्या विक्रमी मताधिक्यासाठी सज्ज व्हा तळेगाव दिघे येथे भव्य युवा निर्धार मेळावा संपन्न

संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-आ. बाळासाहेब थोरात हे स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वच्छ प्रतिमा आणि निष्कलंक नेतृत्व असलेल्या आमदार थोरात यांनी सततच्या विकास कामातून तालुक्याचा कायापालट केला आहे. सुसंस्कृत नेत्यांची परंपरा जपणारे आमदार थोरात आपल्या कर्तृत्वाने राज्यात ओळखले जातात असा गौरवपूर्ण उल्लेख माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केला असून संगमनेर तालुक्यातील जनतेने यावेळेस विक्रमी मताधिक्यासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

तळेगाव दिघे येथे युवक काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित भव्य युवक निर्धार मेळाव्यात हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधिमंडळ पक्ष नेते आ. बाळासाहेब थोरात, शिरूरचे खा. डॉ.अमोल कोल्हे, खा. निलेश लंके,खा. भाऊसाहेब वाकचौरे,मा.आ.डॉ.सुधीर तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, ॲड.माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, रणजितसिंह देशमुख, सौ.दुर्गाताई तांबे, शिवसेनेचे अमर कतारी,बाळासाहेब गायकवाड, यांच्यासह युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्राला स्व.यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार,विलासराव देशमुख अशा समृद्ध नेत्यांची परंपरा आहे. आणि ही परंपरा आ. बाळासाहेब थोरात यांनी जोपासली आहे. लातूरच्या जनतेने आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर कायम प्रेम केले असून महाराष्ट्राचा नेता म्हणून आता त्यांची ओळख झाली आहे. दुष्काळग्रस्त तालुक्याचा सततच्या कामातून त्यांनी विकासातून मोठा कायापालट केला आहे. हा तालुका राज्यात पोहोचवला आहे.

निष्कलंक स्वच्छ नेतृत्व असलेले आ. बाळासाहेब थोरात हे आता सर्वांसाठी आशास्थान ठरले आहे. कर्तुत्वाने त्यांनी ओळख निर्माण केली असून याउलट सध्याचे पुढारी हे टक्केवारीने ओळखले जात आहेत. सर्वात भ्रष्टाचारी सरकार म्हणून महायुतीचे सरकार असून या सरकारला खाली खेचण्याबरोबर राज्यातून सर्वाधिक मतांनी आ. बाळासाहेब थोरात यांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.

तर खा. अमोल कोल्हे म्हणाले की, आ. बाळासाहेब थोरात राजकारणातील दीपस्तंभ आहेत. सुसंस्कृत राजकारण कसे असावे याचा आदर्श त्यांनी नव्या पिढीला दिला आहे. संस्था उभ्या करून तालुक्यातील गोरगरीब माणसे आणि कुटुंब उभे करण्याचे काम आमदार थोरात यांनी केले आहे. याउलट बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्यांनी महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार काटला आहे. महायुतीच्या जाहीरनामा गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केला. 15 लाख रुपये हा जुमला म्हणणारे हेच नेते होते. त्यामुळे महायुतीचा जाहीरनामा हा फक्त निवडणुकीसाठी जुमला असल्याचे त्यांनी म्हटले असून चोरीने पक्ष व चिन्ह मिळवणारे राज्यात अभिमानाने फिरू शकत नाही असा टोला त्यांनी महायुतीला लागला.

तर खा. लंके म्हणाले की, सुसंस्कृत राजकारण काय असते ते संगमनेर मध्ये येऊन शिकावे. दक्षिणेमध्ये त्यांना झटका दिला. संगमनेर हे तर थोरात यांचे होम ग्राउंड आहेत . वाघाची झुलपांगरलेले मांजर कुपटी कुपाटीने पळाले. खरा टायगर संगमनेर मध्ये आहे. त्यांनी ज्याला स्पर्श केला त्याच्या जीवनाचे सोने होते. तालुक्यात उभे असलेल्या खबरीलाल चा राजकीय कडेलोट करा असे आव्हान त्यांनी केले.

तर आ. थोरात म्हणाले की, राजकारण हे तत्वासाठी करायचे असते. मात्र सत्तेसाठी अनेक जण कोलंटउड्या मारतात. इतिहास त्यांना माफ करणार नाही. आपण राहता तालुक्यात चांगलं करण्यासाठी जातो. ते मात्र संगमनेरचा विकास मोडण्यासाठी येतात. निळवंडे धरण व कालवे आपण केले असून पाणी दिले आहे. वरच्या भागांमध्ये ज्यांना पाणी मिळाले नाही त्यांना पाणी देण्यासाठी पुढील काळात काम केले जाईल असे ते म्हणाले.

यावेळी खा. भाऊसाहेब वाकचौरे, मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांनीही मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.जयश्रीताई थोरात यांनी केले. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तळेगाव मध्ये लोटला जनसागर

संगमनेर तालुक्यामध्ये विधानसभा निवडणूक ही महोत्सव म्हणून साजरी होत असून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य युवा मेळाव्यामध्ये तालुक्यातील हजारो युवक मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते. सर्वत्र तरुणाईचा जल्लोष आणि आनंदाचा गजर होता. हे अभूतपूर्व वातावरण पाहून संगमनेर तालुक्याची निवडणूक ही एकतर्फी व विक्रमी मताधिक्यासाठी होणार असल्याचे खासदार निलेश लंके यांनी म्हटले आहे.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!