श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर शहरातील अतिक्रमणाची कारवाई थांबवून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी निवेदनाद्वारे मा. जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच करण ससाने यांनी मागणी केली की अतिक्रमणाच्या ज्या केसेस संदर्भात मुख्याधिकारी यांना पत्रव्यवहार होत आहे,त्या केस मध्ये नक्कीच कार्यवाही करावी.परंतु त्या नावाखाली सर्वसामान्य व्यापारी दुकानदार भरडणार नाही याची दक्षता घ्यावी.
सध्या श्रीरामपूर शहरात अतिक्रमण धारकांना नगरपरिषद प्रशासनाने सात दिवसाच्या आत अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले, जिल्हा बँकेचे संचालक मा उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, मा नगरसेवक आशिष धनवटे यांनी मा जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेऊन अतिक्रमणाची कारवाई थांबवण्याची मागणी केली .
श्रीरामपूर शहरातील अनेक नागरिक गेल्या कित्येक वर्षांपासून उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला छोटे-मोठे व्यवसाय करत आहेत. त्यामुळे अनेकांचा संसार या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यातच पालिका प्रशासनाने अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा बजावल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे छोटे मोठे व्यावसायिक व त्यांचे व्यवसाय उध्वस्त होऊ नये यासाठी मा जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील अतिक्रमण कारवाई थांबवून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी ओगले यांनी मा. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी सालीमठ यांनी मुख्याधिकारी श्रीरामपूर यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून अतिक्रमणासंदर्भात प्रॅक्टिकल निर्णय घ्यावा जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान होणार नाही अशा सकारात्मक सूचना दिल्या.