लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-मानवी आत्मा आणि परमात्मा यांना जोडणाऱ्या सहजयोगाचा प्रत्यक्ष अनुभव लोणी जि.अहिल्यानगर येथे रविवारी हजारो सहजयोगीनी घेतला.विशेष म्हणजे सहजयोग परिवाराच्या प्रमुख श्री माताजी निर्मलादेवी ३५ व्या पूर्वी लोणीत आल्या होत्या आणि त्या सोहळ्याची आठवण यानिमित्ताने प्रत्येक साधकाला झाली.
सहजयोग केंद्र लोणी आणि अहिल्यानगर यांच्या वतीने लोणी बुद्रुक ता.राहाता येथे रविवार २६ जानेवारी रोजी सायंकाळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यालयाच्या भव्य प्रांगणात आत्मसाक्षात्कार व अनुभूती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी माजी मंत्री जेष्ठ नेते अण्णासाहेब म्हस्के पाटील,अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,लोणी बुद्रुकच्या सरपंच कल्पना मैड,लोणी खुर्दचे सरपंच जनार्धन घोगरे,लोणी विकास संस्थेचे चेअरमन अशोक धावणे, विखे ट्रक्स वाहतूक संस्थेचे चेअरमन नंदकिशोर राठी, उपसरपंच गणेश विखे,डॉ.नानासाहेब म्हस्के, डॉ.भलवार, डॉ.जगदाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आलेल्या हजारो सहजयोगिनी श्रीमाताजी निर्मलादेवी यांच्या प्रतिमेची लोणी गावातून सवाद्य मिरवणूक काढली.कार्यक्रम स्थळी पोहचल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी श्रीमाताजींच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
प्रा.बाळासाहेब विखे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर एकनाथ कोकरे यांनी प्रास्ताविक केले.सहजयोग परिवाराचे जिल्ह्याचे मार्गदर्शक प्रा.नितीन पवार यांनी सहजयोग ध्यान साधना आणि आत्मसाक्षात्कार याविषयी माहिती देताना सांगितले की,श्री निर्मलादेवी यांनी सहजयोग ही आत्मज्ञानाची सोपी पद्धत जगातील मानवजातीला दिली.मानवी शरीरातील सुप्त अवस्थेतील कुंडलिनी शक्ती सहजयोगाद्वारे जागृत करता येते. यातून साधकाला सर्वव्यापी परमेश्वराशी जोडता येते आणि त्याला आत्मसाक्षात्कार मिळतो.साधकाच्या टाळूवर आणि तळहातांवर थंड चैतन्य लहरीची जाणीव होते.त्यातून निर्विचार अवस्था प्राप्त होते.नियमित ध्यानातून परमशांतीची अनुभूती साधकाला मिळते.पूर्वीच्या काळी ऋषीमुनी यासाठी खूप तप आणि साधना करीत असत मात्र सामान्य मानवी जीवांसाठी श्रीनिर्माला देवी यांनी सहजयोगाद्वारे हे शक्य करून दाखवले.आज जगातील १६० देशात साधक याचा लाभ घेत आहेत.
यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के म्हणाले की,सर्वसामान्य माणसाला प्रपंचाच्या जबाबदाऱ्या सांभाळून मिळेल तेवढ्या वेळात अध्यात्मिक कार्य करावे लागत आहे.दिर्घकाळाची साधना त्यांना शक्य होत नाही.सर्व धर्मांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तत्वज्ञान मांडून मानवाला ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे.श्री निर्मलादेवी यांनी सोपा,सहज आणि अल्पकाळाचा मार्ग दाखवून संपूर्ण मानव जातीसाठी मोठे काम केले.सहजयोग परिवाराने लोणी सारख्या ठिकाणी सोहळ्याचे आयोजन करून इथल्या लोकांसाठी आत्मसाक्षात्कार आणि अनुभूतीची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांना धन्यवाद दिले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित हजारो साधकांना सहजयोग ध्यान साधनेचे प्रात्यक्षिक करून प्रत्येकाला कुंडलिनी जागृती आणि आत्मसाक्षात्काराचा अनुभव मिळवून देण्यात आला.