कर्जत(जनता आवाज वृत्तसेवा ):-कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी येथील युवक अभिजीत बिटके हा जामखेड हुन आठवडे बाजार करून शनिवारी घरी परत येत असताना माही जळगाव शिवारामध्ये त्याची पिकअप गाडी काही जणांनी अडवली. यानंतर अभिजीत यास मारहाण करून त्याच्याकडे बाजारहून जनावरांची विक्री करून आलेले एक लाख 57 हजार रुपये रोकड व मोबाईल पळवून नेला आहे. ही घटना घडून तीन दिवस झाले तरीदेखील मिरजगाव पोलिसांनी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. रविवारी खासदार निलेश लंके यांनी स्वतः मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या प्रकरणी अभिजीत बिटके यास मारहाण करून लुटणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावी व याची गंभीर दखल घ्यावी अशा सूचना दिल्या तरी देखील मिरजगाव पोलिसांनी खासदारांच्या सूचनेला केराची टोपली दाखवली आहे.
याबाबत अभिजीत बिटके यांनी पत्रकारांना माहिती सांगितली की,शनिवारी आठवडे बाजार झाल्यानंतर त्याच्या स्वतःच्या पिकअप गाडीने तो बिटकेवाडी कडे येत असताना जामखेड येथेच जनावरांची खरेदी विक्री करणाऱ्या त्याच्या मित्राने माझ्याकडे मोटरसायकल आहे आणि अंधार पडत आहे यामुळे तू मोठ्या गाडीत आहेस तर माझ्याकडचे पैसे घरी घेऊन जा असे म्हणून एक लाख 57 हजार रुपये अभिजीत बिटके याच्याकडे दिले. ही रक्कम घेऊन अभिजीत येत असताना कर्जत तालुक्यातील माही जळगाव शिवारामध्ये त्याची गाडी अडवून काहीजणांनी त्याला जबर मारहाण करत त्याच्याकडचे रोकड व मोबाईल चोरून नेला.
घटनेनंतर अभिजीत यांनी मिरजगाव पोलीस स्टेशन येथे जाऊन शनिवारी फिर्याद दाखल करण्यासाठी गेलेले असताना ड्युटीवर असणाऱ्या अंमलदारांनी त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले. उपचार करून आल्यानंतर उद्या सकाळी दहा वाजता या आपण गुन्हा दाखल करू असे सांगितले. मात्र वारंवार हेलपाटी मारू नये आम्हाला बॉसला विचारावे लागेल असे म्हणत मिरजगाव येथील पोलीस अधिकारी श्री कासार यांनी घटना घडवून आज तीन दिवस झाले तरीदेखील मिरजगाव गुन्हा दाखल केलेला नाही. अशी तक्रार अभिजीत बिटके यांनी केली आहे.
आजही अभिजीत बिटके याच्या जीवितास धोका आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी त्याचे मित्र शनिवारपासून अनेक वेळा मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील व श्री कासार यांच्याकडे गेले मात्र त्यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली आहे अशी माहिती हनुमंत घालमे यांनी दिली .
खासदारांचा सूचनेला केराची टोपली
विशेष म्हणजे या घटनेनंतर खासदार निलेश लंके हे रविवारी कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर आलेला असताना दुपारी मिरजगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी गेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील त्या ठिकाणी हजार नसल्यामुळे त्यांनी फोनवरून या प्रकरणी त्यांना अभिजीत बिटके यास झालेल्या मारहाणी व रोकड गेल्याप्रकरणी कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या मात्र तरी देखील मिरजगाव पोलिसांनी कारवाई अथवा पुन्हा दाखल केलेला नाही . सोमवारी देखील फिर्याद देण्यासाठी अभिजीत बिटके व नातेवाईक गेलेले असताना उद्या सकाळी या असे सांगण्यात आले.मारहाण करणारे सर्वजण मोकाट आहेत तर दुसरीकडे अभिजीत यास जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे असे तक्रारदारांनी म्हटले आहे.