शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा):-प्राप्त केलेल्या ज्ञानातून कै.चंद्रकांत बारहाते यांनी आपल्या कर्तृत्वाने निर्माण केलेला अमृतमंथन ग्रंथ प्रेरणादायी असल्याने तो घरोघरी असायला हवा असे मत राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांनी व्यक्त केले.
कै.चंद्रकांत बारहाते यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिना निमित्त त्यांनी शब्दबध्द केलेल्या अमृतमंथन ग्रथांचे प्रकाशन राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्यासह जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, पद्मश्री पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
याप्रसंगी बोलताना बागडे यांनी चंद्रकात बारहाते यांच्या प्रयत्नांचे कौतुक करून या परीवाराने राजकीय, सामाजिक वाटचालीत काम करताना साधेपणा जपला. त्यांच्या लिखाणातून त्यांनी ज्ञानाचा शोध घेण्यासाठी मोठे कष्ट घेतल्यानेच अमृतमंथन ग्रथांची निर्मिती होवू शकली.
अमृतमंथन ग्रंथातून एैतिहसिक, पौराणिक आणि इतर विषयांचे असलेले दाखले प्रेरणा देणारे असून बारहाते यांच्या बौध्दिक क्षमतेची जाणीव आपल्याला होत असल्याचे सांगून राज्यपाल म्हणाले की, लिखाणाची गोडी त्यांनी लावून घेतली. पण यामागे मोठा त्याग असल्याचे गौरवोद्गार त्यांनी आपल्या भाषणात काढले.
जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, अमृतमंथन ग्रंथ विश्वाच्या निर्मीती पासून ते मुक्ती पर्यंतचा इतिहास आहे. मात्र यापेक्षाही महत्वाचे म्हणजे विज्ञान, अध्यात्म आणि एैतिहसिक दाखल्याचा एक महत्वपूर्ण संदर्भ ग्रंथ साहीत्य क्षेत्राला मिळाला आहे.
हिंदू धर्म, संस्कृती आणि प्रथा परंपरावर आज होणा-या आरोप प्रत्यारोपांच्या विखारी प्रचाराला अमृतमंथन ग्रंथ हा एक समर्पक उत्तर ठरणार असल्याचे विखे पाटील म्हणाले. पद्मश्री पोपट पवार यांनी बारहाते यांच्या कौटुंबिक आठवणीचा दाखला आपल्या भाषणात दिला. या गौरव ग्रंथ निर्मितीत योगदान देणा-या व्यक्तींचा राज्यपाल बागडे आणि जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.