23.6 C
New York
Saturday, September 13, 2025

Buy now

spot_img
spot_img

श्रीरामपूर येथे पत्रकारावर जीवघेणा हल्ला; गुन्हा दाखल

श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):– शहरातील मिल्लतनगर परिसरात एका वरिष्ठ पत्रकारावर गंभीर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शांतता कमिटीच्या बैठकीत मशिदीवरील भोंग्याच्या आवाजावर केलेल्या टीकेमुळे संतप्त झालेल्या आरोपींनी पत्रकारावर रात्री उशिरा हल्ला करत त्यांना जबर मारहाण केली. या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्याकडून रोकड आणि सोन्याची चैन हिसकावण्यात आली आहे.

फिर्यादी सलीमखान चांदखान पठाण (वय 60, व्यवसाय (पत्रकारिता) हे श्रीरामपूरमधील मिल्लतनगर, वार्ड नं. 01 येथे राहतात. दिनांक 18 मार्च 2025 रोजी रात्री 10.15 च्या सुमारास, ते नमाज पठानासाठी मिल्लतनगर येथील मशिदीकडे जात असताना त्यांच्या राहत्या घरासमोरच आरोपींनी त्यांना अडवले.

प्राथमिक तपासाअंती असे समोर आले आहे की, शनिवारी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत फिर्यादी पठाण यांनी मशिदीवरील भोंग्याच्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासावर प्रकाश टाकला होता. तसेच, त्यांनी काही आरोपींवर माध्यमांतून टीका केली होती. याच कारणावरून आरोपींमध्ये रोष होता.फिर्यादी पठाण यांना वाटेतच अडवून आरोपी जोएब युनुस जमादार याने त्यांच्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

त्यानंतर आरोपींनी लोखंडी रॉड, लाकडी दांडे व लाथाबुक्क्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. मारहाणीदरम्यान आरोपी झिशान गनी शेख याने फिर्यादीच्या पँटच्या खिशातून 27,000/- रुपये (500 च्या 54 नोटा) जबरदस्तीने काढून घेतले, तर जोएब जमादार याने त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन हिसकावली.

या घटनेनंतर फिर्यादींनी तत्काळ श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोएब युनुस जमादार, हुजेब युनुस जमादार, ओसामा युनुस जमादार, झिशान गनी शेख, राजीक शेख, झिशान सय्यद, लुकमान शहा, शाहीद मुख्तार शेख आणि इतर सात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी गु.र.नं. 0317/2025 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 118(1)(2), 119(1)(2), 189(2), 191(2), 191(3), 190, 115(2), 352, 351(2) तसेच क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट 7 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. श्रीरामपूर शहर पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला आहे. पोलीस सहाय्यक निरीक्षक ठोंबरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. हा हल्ला निषेधार्ह असून, पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेने संपूर्ण पत्रकार संघटनेत संतापाची लाट उसळली असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!