कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा) :-देशातील दिव्यांगांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिव्यांग सहाय्यक साधने वाटपासाठी वर्षाकरिता बजेटमध्ये केलेल्या ७० कोटींच्या तरतुदींपैकी एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच वर्षात ४५ कोटी रुपयांची सहाय्यक साधने वाटप करण्यात आली असून आतापर्यंत सुमारे ५० हजार लाभध्यांना लाभ मिळवून देण्यात आपण यशस्वी ठरलो असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहिल्यानगर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे लोकनेते स्वर्गीय नामदेवरावजी परजणे पाटील यांच्या २१ व्या पुण्यस्मरणानिमित्त संवत्सर परिसरातील २१० दिव्यांग, वयोवृद्धांना प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र, अहिल्यानगर यांच्यामार्फत सहाय्यक साधनांचे रविवारी ( दि. २२) वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. विखे पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व दिवंगत नेते नामदेवरावजी परजणे पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. उपसरपंच विवेक परजणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. व्यासपीठावर गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी प्रशांत गायकवाड, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक नंदकुमार फुले, अहिल्यानगर प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचे कनिष्ठ व्यवस्थापक व नोडल अधिकारी कमलेश यादव, सुपर स्पेशालिटी सेंटरचे व्यवस्थापक डॉ. अभिजित मेरेकर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे नोडल अधिकारी डॉ. दीपक अनाप, सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ ढाकणे, सरपंच सुलोचना ठेपले आदी उपस्थित होते
डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले, सर्वसामान्य माणूस आयुष्यभर कष्ट करतो. वयाच्या साठ वर्षानतर त्यांचे जीवनमान कसं असेल, आर्थिक परिस्थितीमुळे सहाय्यक साधने घेणे शक्य होत नसेल, याचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारकाईने विचार करून ही योजना आणली आहे आणि आज याच योजनेच्या माध्यमातून देशभरात मोठे काम होत आहे. विविध योजना राबविण्यासाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सतत प्रयत्न सुरू राहतील. तसेच संवत्सर गावामध्ये प्रत्येकापर्यंत या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील असा शब्द दिला
राजेश परजणे यांनी आपल्या भाषणातून देशात दिव्यांग व वयोश्री योजनेच्या माध्यमातून सर्वाधिक लाभ मिळवून देण्यासाठी डॉ. सुजय विखे यांचा प्रथम क्रमांक राहिला असल्याचे सांगून डॉ. विखे यांच्या माध्यमातून विखे परिवाराची चौथी पिढी जनसेवेसाठी काम करत आहे. यातूनच जनतेचे विखे परिवारावर किती प्रेम आहे हे लक्षात येते. खासदारकीच्या पराभवानंतर अवघ्या काही दिवसातच पुनश्च एकदा कामाला लागून सुजयवर असलेले प्रेम जनतेने दाखवून दिले आहे.
वयोश्री योजनेच्या माध्यमातून श्रवणयंत्र, मानेचा पट्टा, कमोड चेअर, वॉकर, गुडघ्याचा पट्टा, पाठीचा पट्टा, सिलिकॉन कुशन, पाठीचा आधार पट्टा, तीन व चार पायाची काठी, साधी काठी, ऍडजेस्टेबल काठी, शीटसहित काठी, व्हीलचेअर, कमोड व्हीलचेअर तसेच दिव्यांग योजनेच्या माध्यमातून बॅटरी चलीत तीन चाकी सायकल, श्रवणयंत्र, तीन चाकी सायकल, ब्रेल किट, व्हीलचेअर मोठी, व्हीलचेअर या सहाय्यक साधनांचे वाटप करण्यात आले. राजेश परजणे यांच्या संकल्पनेतून संवत्सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील २१ विद्यार्थिनीचा सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत पहिला हप्ता भरण्यात आला तसेच नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयातील विज्ञान शाखेतून कोमल अरुण कानडी, वाणिज्य शाखेतील वैशाली कचेश्वर खिलारी पठाण परवेज इसरारखान, कला शाखेतील पायल संजय खटकाळे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कॅम्पसाठी डॉ. अभिजित दिवटे यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमास विखे पाटील हॉस्पिटलचे अधिकारी, मदतणीस, संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा दिव्यांग केंद्राचे सर्व अधिकारी, लाभार्थी उपस्थित होते.



