देवळाली प्रवरा(जनता आवाज वृत्तसेवा):-गावातील जेष्ठ नागरिक, वारकरी संप्रदायाच्या श्रद्धास्थान आणि कुटुंब उभारणीतील आदर्श स्त्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमती सखुबाई एकनाथ वाळुंज यांच्या ९७व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नातवाने व स्थानिक उद्योजक हरीश वाळुंज यांनी एक आगळावेगळा उपक्रम राबवत समाजसेवेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
येणाऱ्या १ जुलै २०२५ रोजी साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधत, गावातील तब्बल २०० महिला भाविकांना पंढरपूर येथे विठ्ठल-रखुमाई दर्शनाची मोफत यात्रा आयोजित करण्यात आली आहे. वाढदिवसानिमित्त केक, रोषणाई, गाजावाजा न करता सामाजिक उपयुक्ततेच्या कार्याला प्राधान्य देत साजरा होणारा हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरत आहे.
सखुबाई वाळुंज यांचे संपूर्ण आयुष्य कष्ट, साधेपणा, भक्ती आणि कर्तृत्वाने भरलेले आहे. त्यांनी ४० वर्षांहून अधिक काळ पायी वारी करून वारकरी संप्रदायाशी निष्ठा जोपासली. त्याचबरोबर शेती, दुग्धव्यवसाय, आणि कुटुंब व्यवस्थापन या सर्वच क्षेत्रांत त्यांनी योगदान दिले आणि त्यांनी पाच मुलं आणि एक मुलगी यांच्या संगोपनातून उच्च शिक्षणापर्यंत सर्वांना पोहोचवले.
चार पिढ्यांमध्ये त्यांनी संस्कार, श्रद्धा आणि सेवा यांचे बीज रोवले, आणि आजही त्यांचे कीर्तन-प्रवचनांमधून आदराने स्मरण केले जाते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त साजरी झालेली ही पंढरपूर यात्रा ही “खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा करण्याची प्रेरणा” बनली आहे.
यावेळी महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते विधिवत वाहन पूजन संपन्न झाले. नामदेव महाराज शास्त्री, शिवाजीराव डौले, सचिन ढुस, अनंत कदम, डॉ.विश्वास पाटील, शैलेंद्र कदम, डॉ.संदीप मुसमाडे, राजेंद्र लोंढे, दीपक पठारे, महेश गडाख , कुमार कदम, सतिष होले , दत्तात्रय कदम आदी उपस्थित होते.
या यात्रेतील महिलांच्या नाशता, जेवण, भोजन व राहण्याची व्यवस्था उद्योजक हरीश वाळुंज यांनी केली आहे. यावेळी अमृता वाळुंज यांनी सर्वांचे आभार मानले.
दरम्यान उद्योजक हरीश वाळुंज यांनी उचललेली ही सामाजिक बांधिलकीची कल्पना केवळ कौतुकास्पदच नव्हे तर आजच्या तरुण पिढीसाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरते. साधेपणातही मोठेपण असते, याचा प्रत्यय या उपक्रमातून येत आहे.




Total Users : 642452