spot_img
spot_img

सध्याच्या काळात लोकांना हसवणे हे सर्वात मोठे पुण्य – मनीष मालपाणी समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकरांना मनमुराद हसविले

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):- वेगवान आणि तितक्याच तणावग्रस्त जीवनशैलीच्या सध्याच्या काळात लोकांना हसवणे हे सर्वात मोठे पुण्याचे काम आहे. औषधाच्या डोसाइतकेच, किंबहुना त्यापेक्षाही अधिक गुणकारी हास्याचे डोस आहेत, असे प्रतिपादन संगमनेर फेस्टिवलचे प्रणेते व उद्योगपती मनीष मालपाणी यांनी केले.

राजस्थान युवक मंडळ, मालपाणी उद्योग समूह, संगमनेर नगरपरिषद, शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळे आणि संगमनेरकर नागरिकांच्या सहभागातून आयोजित करण्यात आलेल्या 18 व्या संगमनेर फेस्टिवलचे शानदार उद्घाटन संगमनेरच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या हस्ते मालपाणी लॉन्स येथे झाले.

यावेळी व्यासपीठावर गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय मालपाणी, राजस्थान युवक मंडळाचे कार्याध्यक्ष सागर मणियार, उपाध्यक्ष कल्पेश मर्दा, सचिव कृष्णा असावा, खजिनदार वेणुगोपाल कलंत्री, कार्यकारिणी सदस्य सुमित अट्टल, विजय पतसंस्थेचे चेअरमन पराग सराफ, शारदा पतसंस्थेचे चेअरमन रोहित मणियार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

फेस्टिवलच्या आयोजनामागील भूमिका विशद करताना मनीष मालपाणी म्हणाले, बघता बघता संगमनेर फेस्टिवलच्या वाटचालीला 17 वर्षे पूर्ण झाली असून आपण आता 18 व्या वर्षात पदार्पण केले आहे. संगमनेरच्या रसिक प्रेक्षकांनी पहिल्या वर्षापासून दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच ही वाटचाल शक्य झाली. रसिकांचा भक्कम पाठिंबा मिळत गेल्याने आयोजक म्हणून आमचेही मनोबल वाढले आणि देशातील उत्तमोत्तम सांस्कृतिक कार्यक्रम संगमनेरमध्ये आणण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले.

नृत्य, संगीत, नाटक, कवी संमेलन, एकपात्री प्रयोग अशा विविध कलाविष्कारांचा संगमनेर फेस्टिवलमध्ये सातत्याने समावेश करण्यात आला. देशपातळीवरील अनेक नामवंत कलाकारांनी येथे आपली कला सादर केली आणि त्यामुळे संगमनेर फेस्टिवलला एक वेगळी ओळख व उंची प्राप्त झाली, असेही त्यांनी नमूद केले.

यंदा फेस्टिवलसाठी राजस्थान युवक मंडळाच्या वतीने विशेष प विकसित करण्यात आले असून विविध कार्यक्रमांच्या देणगी प्रवेशिकांची व्यवस्था या पच्या माध्यमातून करण्यात आली आहे. हे प विकसित करण्यासाठी सुमित अट्टल यांनी विशेष योगदान दिल्याबद्दल मनीष मालपाणी यांनी त्यांचे कौतुक केले. उपस्थित रसिकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले.

उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी संगमनेर फेस्टिवलच्या वाटचालीचे कौतुक केले. आज प्रज्वलित झालेली संगमनेर फेस्टिवलची ज्योत ही राजस्थान युवक मंडळ आणि मालपाणी परिवाराच्या सेवाभावाची व सांस्कृतिक बांधिलकीची प्रतीक आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. संगमनेर फेस्टिवलच्या सर्व उपक्रमांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

फेस्टिवलच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेले अभिनेते समीर चौगुले यांच्या सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ या एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच चौगुले यांनी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे हे आपल्या गुरुस्थानी असल्याचे सांगत, दर्जेदार विनोदाची प्रेरणा त्यांच्याकडूनच मिळाल्याचे नमूद केले.

प्रेम’ या विषयापासून आपल्या खास शैलीत संवादाची सुरुवात करत समीर चौगुले यांनी सुमारे दोन तास रसिकांना खळखळून हसविले. दैनंदिन जीवनातील प्रसंग, नातेसंबंध आणि मानवी स्वभावातील गंमतीदार बारकावे त्यांनी आपल्या सहज अभिनयातून मांडले. त्यांच्या प्रत्येक निरीक्षणाला रसिकांकडून हास्य आणि टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या मैफिलीने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटनाचा सोहळाही दिमाखदार ठरला. मालपाणी उद्योग समूहाच्या सुरक्षा विभागाने फेस्टिवलची ज्योत शिस्तबद्ध सवाद्य पथसंचलनातून व्यासपीठावर आणून फेस्टिवलचे प्रणेते मनीष मालपाणी यांच्याकडे सुपूर्त केली. त्यानंतर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे आणि मनीष मालपाणी यांच्या हस्ते फेस्टिवलची ज्योत प्रज्वलित करण्यात आली.

ज्योत प्रज्वलित होताच आकर्षक इलेक्ट्रिक आतषबाजी करण्यात आली आणि टाळ्यांच्या कडकडाटात 18 व्या संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटनाची घोषणा झाली. हा देखणा क्षण अनेक रसिकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केला. संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजस्थान युवक मंडळाचे कार्याध्यक्ष सागर मणियार यांनी केले. सूत्रसंचालन मालपाणी उद्योग समूहाचे ज्येष्ठ व्यवस्थापक रमेश घोलप यांनी केले, तर सचिव कृष्णा असावा यांनी आभार मानले.

या उद्घाटन सोहळ्यास आणि समीर चौगुले यांच्या कार्यक्रमास संगमनेर शहर व परिसरातील विविध स्तरांतील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!