अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा) :- महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दीपावली पाडव्यानिमित्त प्रोफेसर कॉलनी चौक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर दीप वंदना उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी दीप प्रज्वलित करून स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
स्वर्गीय अजितदादा पवार हे आपल्यातून निघून गेले असले, तरी त्यांच्या आठवणी सदैव आपल्या स्मरणात राहतील. महाराष्ट्राला योग्य दिशा देण्याचे काम त्यांनी केले. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून अहिल्यानगर शहराशी त्यांचे अतूट नाते निर्माण झाले होते. त्यांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. अशा कर्तृत्ववान नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले.
यावेळी महापौर ज्योतीताई गाडे, अंजली आव्हाड, अमोल गाडे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, अजिंक्य बोरकर, सुनील त्रिंबके, सुमित कुलकर्णी, दीपक खेडकर, गजेंद्र भांडवलकर, राहुल सांगळे, जयकुमार रंगलानी, सूरज शिंदे, योगिता कुडिया आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर ज्योतीताई गाडे म्हणाल्या की, दीपावली पाडव्याच्या निमित्ताने स्वर्गीय अजितदादा पवार महाराष्ट्रातील जनतेला भेटत असत. प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करून कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद साधत असत. आज ते आपल्यात नाहीत, याची उणीव सर्वांनाच जाणवत आहे. त्यांची उणीव कधीही भरून निघणारी नाही. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी दीप वंदना उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
अंजली आव्हाड म्हणाल्या की, स्वर्गीय अजितदादा पवार दीपावली पाडव्याच्या निमित्ताने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आणि जनतेला भेटत असत. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन आपुलकीने विचारपूस करत असत. आज अजितदादा आपल्यात नसल्याने संपूर्ण महाराष्ट्राला त्यांची आठवण येत आहे. दीपावली पाडव्याच्या निमित्ताने आयोजित दीपोत्सवाच्या माध्यमातून अजितदादांना खरी श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.




Total Users : 679983