कोल्हार(जनता आवाज वृत्तसेवा) :– कोल्हार येथील लक्ष्मीबाई कुंकूलोळ संकुलाच्या मागील दक्षिण बाजूस असलेल्या गट क्रमांक ५२३ मधील शेतात बुधवारी (दि. ११ नोव्हेंबर) दुपारी साडेएक वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत प्रगतशील शेतकरी शिरीष तात्या खर्डे यांचा सुमारे १५ गुंठे ऊस जळून खाक झाला असून, डॉ. सुनील खर्डे यांच्या बांबू पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गट क्रमांक ५२३ मध्ये शिरीष तात्या खर्डे यांची २० गुंठे ऊस शेती, तर डॉ. सुनील खर्डे यांची २० गुंठे बांबूची शेती आहे. बुधवारी दुपारी उसाच्या शेताच्या मध्यभागातून अचानक आगीचे लोळ उठत असल्याचे लक्ष्मीबाई कुंकूलोळ संकुलातील रहिवाशांच्या निदर्शनास आले. रहिवाशांनी प्रसंगावधान राखत तातडीने पद्मश्री विखे कारखान्याच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच काही मिनिटांतच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, तोपर्यंत सुमारे १५ गुंठे ऊस जळून खाक झाला होता. तसेच शेजारील बांबूच्या शेतीलाही आगीची झळ बसल्याने मोठे नुकसान झाले.
या मदतकार्यात प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे मुख्य सुरक्षा अधिकारी नंदकुमार डेंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन वाहनाचे चालक दिनकर पठारे, फायरमन प्रकाश गोल्हार व संदीप शिंदे तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आपदा मित्र अनिल जाधव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
यावेळी कोल्हार येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल निबे, लक्ष्मीबाई कुंकूलोळ संकुलातील रहिवासी डॉ. नवनाथ शिंदे, आशुतोष बोरसे, श्रीकांत धुमाळ, आसिफ शेख, पप्पू बिल्डर तसेच पत्रकार गणेश सोमवंशी यांनीही आग विझविण्यासाठी तत्परतेने सहकार्य केले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच कोल्हारच्या मध्यवर्ती बाजारपेठेत विठ्ठल मंदिराशेजारील भरत, कैलास व बाळासाहेब कोळपकर यांच्या भांड्याच्या गोदामाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. ही घटना ताजी असतानाच आता ऊस व बांबूच्या शेतीला आग लागल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे अशा आगीच्या घटना घडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे पाटील, कोल्हार भगवतीपूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजित मोरे, उद्योजक विनीत हिरानंदानी तसेच दीपक डंक व प्रदीप खर्डे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व घटनेची माहिती घेतली.
सध्या कोरडे वातावरण आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे आगीचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी दिवाळीत फटाके व आतषबाजी करताना विशेष खबरदारी घ्यावी. शेतशिवार, पिके आणि मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे पाटील यांनी केले आहे.




Total Users : 679256