संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गेल्या १० ते १५ वर्षांपासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आरोग्यसेवेचे कर्तव्य बजावणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागणीला अखेर यश आले आहे. या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी २०२६ च्या पावसाळी अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधत ठामपणे आवाज उठविला होता. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, शासनाने १४ हजार ७८७ पात्र कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. तसेच या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वार्षिक ९८३ कोटी ८० लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.
शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अनेक वर्षांपासून सेवेत कार्यरत असलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाबद्दल संगमनेर तालुक्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आमदार खताळ यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. तसेच त्यांच्या पाठपुराव्याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी बोलताना आमदार खताळ म्हणाले की, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्यसेवेचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. विशेषतः कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या कर्मचाऱ्यांनी रुग्णांची सेवा केली. संकटाच्या काळात आरोग्य यंत्रणेचा महत्त्वाचा आधार बनून त्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले. मात्र, एवढी वर्षे सेवा करूनही त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे अपेक्षित लक्ष दिले जात नव्हते.
या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भविष्याचा विचार करून त्यांना न्याय मिळावा, यासाठी पावसाळी अधिवेशनात शासनाकडे आग्रही मागणी केली होती. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे शासनाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. १४ हजार ७८७ कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा निर्णय हा त्यांच्या अनेक वर्षांच्या कष्टांचा आणि सेवाभावाचा सन्मान आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार असून, त्यांच्या कामालाही योग्य प्रतिष्ठा मिळेल.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी यापुढेही आपण ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणार असून, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार खताळ यांनी दिली. दरम्यान, या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार अमोल खताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आभार मानले. शासनाच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.




Total Users : 677368