spot_img
spot_img

जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय समीकरणांना धक्का; लहामटे पराभूत, लंके-तनपुरे-काळेंचा विजय अकोलेत संजीवनी शिंदे (गायकर) यांचा मोठा विजय; पारनेरमध्ये खा. निलेश लंके, राहुरीत प्राजक्त तनपुरे, शेतीपूरक मतदारसंघातून आ. आशुतोष काळे विजयी

अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा):- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बिनविरोध न झालेल्या दहा जागांसाठी सोमवारी झालेल्या मतदानानंतर मंगळवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होत असताना काही महत्त्वाच्या मतदारसंघांत लागलेल्या निकालांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर ठसा उमटवला. विशेषतः अकोले मतदारसंघात आमदार किरण लहामटे यांचा झालेला पराभव हा निकालाचा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला.

विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातील अकोलेमध्ये संजीवनी शिंदे (गायकर) यांनी ४९ मते मिळवत विजय मिळविला. त्यांचे प्रतिस्पर्धी आमदार किरण लहामटे यांना ३६ मतांवर समाधान मानावे लागले.

पारनेर मतदारसंघात खासदार निलेश लंके यांनी ६४ मते मिळवत राहुल शिंदे (४० मते) यांचा पराभव केला. कर्जत मतदारसंघात ज्योती प्रकाश शिंदे यांनी ५४ मते मिळवून तुषार अंबादास पिसाळ (२० मते) यांच्यावर विजय मिळविला.

राहुरी मतदारसंघात प्राजक्त तनपुरे यांनी ८९ मते मिळवत सत्यजित कदम (१८ मते) यांचा एकतर्फी पराभव केला.

महिला राखीव मतदारसंघातून अनुराधा नागवडे (९३९ मते) आणि संगीता जयंत वाघ (७५४ मते) विजयी झाल्या. शेतीपूरक प्रक्रिया मतदारसंघातून आमदार आशुतोष काळे यांनी विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले.

जिल्हा बँकेच्या उर्वरित जागांचे निकाल जाहीर होत असताना जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष मतमोजणीकडे लागले असून, या निकालांमुळे आगामी राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!