लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):- शासनाची कोणतीही परवानगी नसताना वाळूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनावर लोणी पोलिसांनी मध्यरात्री कारवाई केली. राजुरी (ता. राहाता) शिवारात श्रीरामपूर–लोणी रस्त्यावर करण्यात आलेल्या या कारवाईत १५ लाख रुपये किमतीचा हायवा आणि त्यामधील ३२ हजार रुपये किमतीची वाळू असा एकूण १५ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी रविंद्र काशीनाथ कदम (वय ३७, रा. गोंडेगाव, ता. श्रीरामपूर) याच्याविरुद्ध लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी पहाटे १.४५ वाजण्याच्या सुमारास राजुरी गावच्या शिवारातील सहकारी सोसायटी कार्यालयाजवळ श्रीरामपूर–लोणी रस्त्यावर एक हायवा वाहन संशयास्पद स्थितीत आढळून आले. पोलिसांनी तपासणी केली असता वाहनामध्ये विनापरवाना वाळू वाहतूक केली जात असल्याचे आढळले.
या कारवाईत भारत बेंझ कंपनीचा निळ्या-पांढऱ्या रंगाचा हायवा (एमएच १७ सीव्ही ७३०२) जप्त करण्यात आला. वाहनामध्ये सुमारे ४ ब्रास वाळू होती. तिची किंमत ३२ हजार रुपये असून, वाहनाची किंमत १५ लाख रुपये आहे.
याबाबत लोणी पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल अशोक शशीकांत गाडे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३ (२), ३ (५) तसेच महाराष्ट्र पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार साईनाथ राशीनकर पुढील तपास करीत आहेत.




Total Users : 675684