अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा):- अहिल्यानगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे. या महाविद्यालयाच्या मान्यतेसह विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी खासदार डॉ. नीलेश लंके यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने १६ सप्टेंबर रोजी शासन निर्णय काढून प्रवेशास मान्यता दिली आहे.
अहिल्यानगर येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच त्यास संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास यापूर्वी केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर परवानगी देण्यात आली होती. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रथम वर्षाच्या १०० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची परवानगी प्रलंबित होती. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानेही प्रथम अपील फेटाळले होते.
दरम्यान, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांनी १५ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न ४३० खाटांच्या रुग्णालयास २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रथम वर्षात १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर राज्य शासनानेही याबाबत शासन निर्णय जारी केला.
या निर्णयानुसार महाविद्यालयाची प्रवेश क्षमता १०० विद्यार्थ्यांची राहणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापूर्वी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांचे संलग्नीकरण प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी निश्चित केलेले नियम व मानके आणि प्रवेशाची निर्धारित कार्यपद्धती यांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.
ही परवानगी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी असून, पुढील शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापूर्वी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून परवानगीचे नूतनीकरण करून घेणे आवश्यक राहणार आहे. मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही, असेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. महाविद्यालयासोबत ४३० खाटांचे संलग्न रुग्णालय असल्याने वैद्यकीय शिक्षणासोबतच आरोग्यसेवेच्या सुविधांनाही यामुळे चालना मिळणार आहे.




Total Users : 641933