राहुरी(जनता आवाज वृत्तसेवा) :- राहुरी तालुक्यातील चिंचोली गावच्या शिवारात प्रवरा नदी पात्रामध्ये विरभद्र मंदीर व स्मशानभूमीच्या जवळ काही व्यक्ती अवैधरित्या विनापरवाना, बेकायदा चोरून वाळूचा उपसा करत असल्याची खात्रीशीर माहिती परिक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाला मिळताच ते तात्काळ चिंचोलीच्या दिशेने रवाना झाले आणि प्रवरा नदीपात्रात होत असलेल्या अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांवर छापा टाकून कारवाई केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, डोक्यात टोपी, पॅण्ट-शर्टचा पेहराव, काळा गॉगल असा वेषांतर करून एका खाजगी पिकअप वाहनात बसून सोमवारी सायंकाळी प्रवरा नदीपात्रात घुसून परिक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी चिंचोली फाटा परिसरात वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
डीवायएसपी खाडे यांनी चिंचोली फाटा येथील प्रवरा नदीपात्रात वाळू तस्करांवर छापा टाकत जवळपास अठ्ठावीस लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये १८ ब्रास वाळू, १ डंपर, दोन ट्रॅक्टर असा मुद्देमाल जप्त करून शंकर राजेंद्र भोसले (वय २७, रा. पिंपळगाव फुनगी, ता. राहुरी जि. अहिल्यानगर), शहादेव विठ्ठल माने (वय २९, रा.लेंडी तलाव, मेहकर, जि. बुलढाणा हल्ली रा. बिरोबा मंदीरामागे चिंचोली ता.राहूरी), अभिषेक राजेंद्र नाचणे (वय २९, रा.नवले वस्ती बेलापूर ता. राहूरी जि. अहिल्यानगर) यांना अटक केली असून गणपत गफले (रा. संक्रापूर, ता. राहुरी जि. अहिल्यानगर), निखील बबन लाटे (रा. चिचोली ता. राहुरी), संदीप लाटे (रा. चिचोली ता. राहूरी), दिपक बबन लाटे (रा. चिंचोली) हे मात्र फरार झाले आहे. या सात आरोपींवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्म, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, पोसईराजेंद्र वाघ, सफो शकील शेख, पोहकों शंकर चौधरी, पोहेकों अरविंद भिंगारदिवे आदींच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.




Total Users : 642011