कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा):-कोपरगाव शहरातील गांधीनगर परिसरात भवानी चौकात मध्यरात्री एका तरुणावर कोयता, लोखंडी पाइप आणि बेसबॉलच्या दांड्याने निर्घृण हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात रूपेश ज्ञानेश्वर गायकवाड (वय २३, रा. गांधीनगर) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, या प्रकरणी चार आरोपींविरोधात कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना गुरुवारी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजता घडली. रूपेश गायकवाड भवानी चौक परिसरातून जात असताना अचानक हर्षल रोकडे, रोहित कुंढारे, गणेश रोकडे आणि वैभव कुऱ्हाडे या चौघांनी त्याला आडवले. हर्षल रोकडेने गळा पकडून त्याला खाली पाडले आणि बेसबॉलच्या दांड्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर इतर तिघांनी लोखंडी पाइप आणि धारदार कोयत्याने रूपेशवर वार केले.
या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी अवस्थेत रूपेशला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. रूपेश गायकवाड याने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हर्षल रोकडे, रोहित कुंढारे, गणेश रोकडे आणि वैभव कुऱ्हाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
कोपरगावमध्ये अवैद्य धंद्याचा सुळसुळाट ?
गेले काही महिन्यापूर्वी अवैद्य धंदे करणाऱ्या काही लोकांमध्ये किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारी पर्यंत पोहोचले. त्यानंतर तिथे गोळीबारही झाला. तरीपण कोपरगावमध्ये बनावट दारू, गुटखा सर्रास विक्री , वाळू व्यवसाय , मटका व्यवसाय त्याचबरोबर अवैद्य लॉटरी व्यवसाय सुद्धा चालू आहे. याकडे कोपरगाव तालुक्यातील पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. अशी चर्चा नागरिकांमध्ये झडत आहे.



